मराठा क्रांती मोर्चा; राज्यातून समन्वयक सहभागी होणार
पुणे – मराठा समाजाला न्याय मिळावा यासाठी खासदार संभाजीराजे आझाद मैदानावर आमरण उपोषण करणार आहेत. या उपोषणाला पुणे जिल्ह्यातून संपूर्ण जाहीर पाठिंबा असल्याचे मराठा क्रांती मोर्चाचे राज्य समन्वयक राजेंद्र कोंढरे यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. यावेळी मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक धनंजय जाधव, रघुनाथ चित्रे पाटील, बाळासाहेब अमराळे, नाना निवंगुणे, अमर पवार, गणेश मापारी, संदिप लहाने, श्रृतिका पाडाळे, रोहित भोसले आणि व्दारकेश जाधव उपस्थित होते.
कोंढरे म्हणाले की, मुंबई येथे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री व प्रमुख मंत्र्यांसोबत झालेल्या बैठकीमध्ये या शासनाने मागण्या मान्य करून त्या पूर्ण करण्यासाठी 15 दिवसांचा वेळ मागितला होता, यासाठी महिन्यांचा वेळ दिला. मात्र, आज आठ महिने उलटले तरी अद्याप समाजाच्या मागण्यांवर कोणतीही ठोस कार्यवाही केलेली नाही.
न्या. दिलीप भोसले यांच्या समितीने सांगितलेले 12 मुद्दे शासनाने गांभीर्याने घेतलेले नाहीत. प्रत्येक जिल्ह्यातील वसतिगृहाचा विषय, कोल्हापूर येथील सारथीचे उपकेंद्र, सारथी संस्थेच्या निधीचा प्रश्न, कोपर्डी खून खटल्याची सुनावणी मुंबई उच्च न्यायालयात लवकर सुरू करण्याबाबत कोणतीच कार्यवाही झालेली नाही. या सर्व विषयावर खासदार संभाजीराजे आमरण उपोषण करणार असून संपुर्ण राज्यातून मराठा समन्वयक सहभागी होणार आहेत, असे कोंढरे यांनी सांगितले.