पुणे- महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये “इन्कमिंग’ सुरू झाल्याने इतर राजकीय पक्षांच्या भुवया उंचावल्या आहेत. त्यामुळे शहरात निवडणुकीचे वारे वाहू लागल्याचे दिसत आहे.
गेल्या महिनाभरात पक्षाचे दोन वेळा पक्षप्रवेश कार्यक्रम झाले. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत झालेल्या पहिल्या कार्यक्रमात माजी नगरसेवक सदानंद शेट्टी, स्थायी समितीचे माजी अध्यक्ष श्रीकांत शिरोळे यांच्यासह इतर कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादीची वाट धरली. तर, चार दिवसांपूर्वी झालेल्या दुसऱ्या सोहळ्यात माजी नगरसेवक लक्ष्मण आरडे, माजी नगरसेविका वैजयंती पासलकर, शांतिलाल सुरतवाला यांच्यासह इतर अनेक कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला. येत्या काळात “इन्कमिंग’ सुरूच राहणार असल्याचे पक्षातील काही पदाधिकाऱ्यांनी सांगितले.
सध्या भाजपचे नगरसेवक असलेले, परंतु पूर्वाश्रमीचे राष्ट्रवादी कॉंग्रेसचे काही नगरसेवक स्वगृही परतणार असल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली. सन 2017 च्या निवडणुकीत भाजपने सर्व नितींचा वापर करत महापालिकेवर सत्ता मिळवल्याची सल राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या प्रमुख नेत्यांमध्ये आहे.
त्यामुळे 2022 च्या निवडणुकीत कुठल्याही परिस्थितीत पुणे महापालिकेवर राष्ट्रवादी कॉंग्रेसची सत्ता स्थापन करण्याचा चंग नेत्यांनी बांधला आहे. निवडून येण्याचे “मेरिट’ असलेल्यांनाच पक्षात प्रवेश देण्यात येत असल्याचे नेते सांगत असले, तरी सध्याचे पक्षप्रवेश कार्यकर्त्याचे बळ वाढवण्यासाठी वातावरण निर्मितीसाठी पक्षाला फायदेशीर ठरणार असल्याचे दिसते.