सातारा शहर, औंध, दहिवडी, पुसेगावची अवस्था; साताऱ्यात घरफोड्यांचे सत्र सुरूच
प्रशांत जाधव
सातारा – काही अपवाद वगळता जिल्हा पोलीस दल चांगले काम करत आहे. त्यातूनही किरकोळ घटना घडतच असतात; परंतु जिल्ह्यातील काही पोलीस ठाण्यांचे कारभारी बदलल्याने अवैध धंद्यांनी डोके वर काढल्याचे चित्र आहे. सातारा शहर, औंध, दहिवडी, पुसेगाव, वाठार स्टेशन या पोलीस ठाण्यांच्या हद्दीत अवैध धंद्यांबरोबर चोऱ्यामाऱ्या वाढल्या आहेत.
सातारा शहरात घरफोड्यांचे सत्र सुरू झाले आहे.जुन्या कारभाऱ्यांनी ठेवलेला वचक कायम राखण्यात नवे कारभारी अपयशी ठरत आहेत की, त्यांना हारतुऱ्यांमधून कामकाजाकडे लक्ष द्यायला वेळ मिळत नसल्याची चर्चा आहे. जुगार, मटका अशा धंद्यांनी डोके वर काढल्याने नव्या कारभाऱ्यांना आता आपला “दम’ दाखवावा लागेल.
सातारा परिसरात दुचाकी वाहने, जनावरांच्या चोऱ्या व घरफोड्या वाढत असल्याने पोलिसांची डोकेदुखीही वाढली आहे. या घटनांमुळे नागरिक चिंताग्रस्त आहेत. सातारा शहर पोलीस ठाण्यापासून हाकेच्या अंतरावर असलेल्या पोलीस ऑफिसर्स क्लबमध्ये रहात असलेल्या अधिकाऱ्यांनाही चोरट्यांनी हिसका दाखला आहे. त्यामुळे “हे भगवान, साताऱ्यातील चोरट्यांना कोण आवरणार, असा सवाल सातारकर विचारत आहेत.
औंध पोलीस ठाण्याच्या हद्दीतील पुसेसावळी ही गुटखा विक्रीचे केंद्र बनले आहे. दारू व मटका अड्ड्यांचीही चलती आहे. या पोलीस ठाण्याचे आधीचे प्रभारी सपोनि उत्तम भापकर यांनी अवैध धंद्यांना बऱ्यापैकी आळा घातल्याने सर्वसामान्यांना फारसा त्रास होत नव्हता; परंतु त्यांची बदली होताच पुसेसावळीत गुटखा विकणाऱ्या “भाई’ने पुन्हा जम बसवायला सुरुवात केली आहे. त्याला पोलीस दलातीलच काही बहाद्दरांची साथ असल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे अवैध धंद्यांसह घरभेद्यांना आळा घालण्याचे आव्हान नवे कारभारी, सपोनि प्रशांत बधे यांच्यासमोर आहे.
दहिवडी हे माण तालुक्यातील अतिशय संवेदनशील पोलीस ठाणे आहे. सपोनि प्रवीण पाटील यांनी या पोलीस ठाण्याचे प्रभागी म्हणून काम करताना गुन्हेगार व त्यांच्या पाठीराख्यांना कायद्याचा हिसका दाखवला होता. त्यामुळे नंतर आलेल्या सपोनि राजकुमार भुजबळ यांना फारसे कष्ट घ्यावे लागले नाहीत; परंतु त्यांनी पोलिसिंगसोबत लोकांशी संवाद साधण्यावर भर दिला होता. पोलीस ठाण्याच्या जुन्या इमारतीचे रूपडेही त्यांनी पालटले. त्यांच्या बदलीनंतर संतोष तासगावकर हे दहिवडीत हजर होताच दारू, मटका व इतर धंद्यांची चलती सुरू झाल्याचे बोलले जात आहे.
तासगावकर हे रांगडे, धाडसी असून, त्यांनी आपल्या व्यक्तिमत्त्वाचा उपयोग गुन्हेगारांना जरब बसवण्यासाठी करावा, अशी अपेक्षा आहे. पुसेगाव पोलीस ठाण्यात गेले काही महिने अधिकाऱ्यांचा खो खोचा खेळ सुरू आहे. तेथे कुणाचाच कुणाला ताळमेळ नसल्याचे चित्र आहे. परिणामी अवैध धंदे करणाऱ्यांना सुगीचे दिवस आले आहेत. सपोनि संदीप शितोळे यांना “ऍक्टिव्ह’ व्हावे लागेल. कायदा सर्वश्रेष्ठ आहे, हे दाखवून देतानाच पोलीस ठाण्यातील काही भानगडबाजांना आवरावे लागेल.