पुणे – एकीकडे शहर स्मार्ट सिटी म्हणून नावारुपाला येत असल्याची चर्चा होत असतानाच चित्र मात्र विरोधाभासीच दिसत आहे. दिवाळीचा सण अगदी काही दिवसांवर येऊन ठेपला असतानाच स्वारगेट भागातील (लक्ष्मी नारायण चित्रपटगृहाजवळील) उड्डाणपुलावरील काही भागांतील स्ट्रीट लाइट (पथदिवे) बंद आहेत. स्वारगेटच्या दिशेने जाताना साईबाबा मंदिर ते सारसबाग डायव्हर्जनदरम्यानचे स्ट्रीट लाइट पूर्णपणे बंद असतात.
परिणामी रात्री-अपरात्री या उड्डाणपुलावर अंधारामुळे अंदाज न आल्याने वाहने कठड्याला धडकून अपघाताची शक्यता नाकारता येत नाही. गंमतीचा भाग म्हणजे कात्रजकडे जाणाऱ्या उड्डाणपुलावरील स्ट्रीट लाइट चालू स्थितीत आहेत.
मात्र, स्वारगेटकडे जाणाऱ्या लेनवरील मात्र पूर्णपणे बंद आहेत. आशिष मकदूम हा वाहनचालक म्हणाला, गेल्या एक-दोन दिवसापासून हे स्ट्रीट लाइट बंद असून पुलाच्या सुरुवातीला खड्ड्यांमुळे दुचाकीस्वारांचा अपघात होऊ शकतो.
स्वारगेट येथील उड्डाणपुलावर जेथे स्ट्रीट लाइट बंद असतील, तेथे ते सुरू केले जातील. मी याच उड्डाणपुलावरून ये-जा करत असतो. मात्र शनिवारी-रविवारी सुट्टी असल्याने मी येथून गेलेलो नाही. तरीही पाहणी करून तातडीने स्ट्रीट लाइट कार्यान्वित करण्यास सांगितले जाईल.
– श्रीनिवास कंदूल, मुख्य अभियंता, विद्युत विभाग