पुणे – शहराच्या उपनगरांमध्ये रिकाम्या जागांमध्ये मोठ्या प्रमाणात क्रीडा संकुले उभारण्यात आली असून, त्याचा व्यावसायिक वापर सुरू आहे. या संकुलांच्या ठिकाणी आधी मोकळ्या जागा असल्याने त्यांना या जागांचा कर लावण्यात आला आहे. त्यामुळे अशा मिळकती शोधून त्यांना व्यावसायिक दराने कर आकारणी करण्यात येणार आहे. त्यासाठी शहराच्या उपनगरांमध्ये महापालिकेच्या मिळकतकर विभागाकडून अशा मिळकतींची माहिती संकलित करण्यात येत आहे.
महापालिकेकडून शहरातील नोंद न झालेल्या मिळकती तसेच कर लागल्यानंतर नव्याने बांधकाम वाढवून वापरण्यात येत असलेल्या इमारती शोधण्यात येत आहेत. त्यासाठी पालिकेकडून आर्टिफिशल इंटेलिजन्स यंत्रणेचा वापर करण्यात येत आहे. मात्र, त्या सोबतच आधी रिकाम्या जागेचा कर लावलेला आहे आणि नंतर त्या ठिकाणी क्रीडा संकुल उभारून त्याचा व्यावसायिक वापर सुरू केला आहे. मात्र, कर रिकाम्या जागेचा भरला जात आहे. त्यामुळे अशी क्रीडा संकुले महापालिकेच्या रडारवर असून, सिंहगड रस्ता, धायरी, वारजे, नगर रस्ता, कोंढवा भागात मोठ्या प्रमाणात अशी क्रीडा संकुले असून, त्यांची तपासणी कर संकलन विभागाकडून सुरू करण्यात आली आहे.