पुणे – तब्बल 24 वर्षांनी पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीला मुहूर्त मिळाला आहे. 29 एप्रिल रोजी 18 जागांसाठी मतदान होणार आहे. त्याची मतमोजणी 30 एप्रिल रोजी होऊन निकाल जाहीर करण्यात येणार आहे. 18 पैकी 11 उमेदवार हवेली तालुक्यातील विविध कार्यकारी सोसायटी सदस्यांच्या मतदानातून, चार उमेदवार ग्रामपंचायत सदस्यांच्या मतदानातून, दोन व्यापारी प्रतिनिधी आणि एक हमाल, तोलणार प्रतिनिधी असणार आहे.
राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरणाचे सचिव डॉ. पी. एल. खंडागळे यांनी याबाबत परिपत्रक काढले आहे. 1999 मध्ये शेवटची निवडणूक झाली होती. सध्या मधुकांत गरड हे प्रशासकीय अधिकारी बाजार समितीचे प्रशासक आहेत. निवडणुकीसाठी मतदार यादी तयार करण्याची प्रक्रिया 16 जानेवारीपासून सुरू करण्यात येणार आहे. 15 मार्च रोजी संकेतस्थळावर अंतिम मतदार यादी प्रसिद्ध करण्यात येणार आहे.
2003 मध्ये निवडून आलेले प्रशासकीय मंडळ बरखास्त करण्यात आले होते. त्यानंतर निवडणूक लांबविली होती. या कालावधीत सत्तेवर आलेल्या विविध राज्य सरकारकडून ही निवडणूक लांबविण्यात आली. दरम्यान, राजकीय नेते आणि प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या प्रशासकीय मंडळांमार्फत बाजार समितीचा कारभार सुरू आहे.
निवडणूक घेण्याची मागणी विविध घटकांमधून होत होती. मात्र आता मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने दिलेल्या आदेशानुसार निवडणूक जाहीर करण्यात आली आहे. लवकरच निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांची नेमणूक केली जाणार आहे.