पुणे : मुंढवा भागातील एकाच कुटुंबातील चौघांनी आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना शुक्रवारी रात्री उशिरा उघडकीस आली.
पुण्यातील मुंढवा परिसरात विषारी द्रव्य प्राशन करून एकाच कुटुंबातील चार जणांची आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. मृतांमध्ये पती-पत्नी आणि दोन मुलांचा समावेश आहे.
शेअर मार्केटमध्ये मोठं आर्थिक नुकसान झाल्यामुळे आत्महत्या केली असावी असा प्राथमिक अंदाज वर्तवण्यात येत आहे. शेजारी राहणाऱ्या लोकांच्या लक्षात हा सर्व प्रकार आला.. त्यानंतर त्यांनी पोलिसांना याची माहिती दिली. मुंढवा पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून तपास करण्यात येत आहे.
दिपक थोटे (59) इंदू दिपक थोटे ( 45) मुलगा ऋषिकेश दिपक थोटे (24) मुलगी समीक्षा दिपक थोटे (17) अशी आत्महत्या केलेल्या चौघांची नावे आहेत. दोन महिन्यापूर्वी ते केशवनगर परिसरात वास्तव्यास आले होते.
या घटनेची माहिती मिळताच मुंढवा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अजितकुमार लकडे आणि पथकाने घटनास्थळी धाव घेतली. आत्महत्या करणाऱ्यांची नावे अद्याप समजू शकलेली नाहीत. पोलिसांचे पथक घटनास्थळी पोहोचले असून अधिक तपास करण्यात येत आहे. एकाच कुटुंबातील चौघांनी आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आल्यानंतर परिसरात खळबळ उडाली आहे. पोलिसांकडून परिसरातील रहिवाशांची चौकशी करण्यात येत आहे.