पुणे – जागेअभावी झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाची (एसआरए) कार्यालय महापालिकेच्या आणि खासगी अशा दोन जागांमध्ये कार्यरत आहे. प्राधिकरणाकडील कामाची व्याप्ती तसेच सर्व कार्यालये एकाच ठिकाणी असावी, यासाठी एसआरएने इमारतीच्या बांधकामाबतचा प्रस्ताव शासनास सादर केला होता. त्यास शासनाने परवानगी दिली असून संगमवाडी येथील भूखंडावर एसआरएचे कार्यालय उभे राहणार आहे. त्यामुळे प्राधिकरणाला हक्काची जागा मिळाली असून सर्व कार्यालये एकाच छत्राखाली येणार आहे.
एसआरएचे एक कार्यालय खासगी जागेत असल्याने भाड्यापोटी वार्षिक 13 लाख इतके मासिक भाडे प्राधिकरण स्तरावर खर्च होत आहेत. तसेच कार्यालये वेगवेगळ्या ठिकाणी असल्याने ते नागरिकांसाठी गैरसोयीचे ठरत होते. त्यामुळे प्राधिकरणाने मागील दोन-तीन महिन्यांपूर्वी शासनाला याबाबतचा प्रस्ताव सादर केला होता.
त्यानुसार गृहनिर्माण विभागाने पुणे रेल्वे स्टेशन परिसरातील संगमवाडी येथील टीपीएस क्रमांक 3 मधील फायनल प्लॉट क्रमांक 98 येथे राबविण्यात येत असलेल्या झोपडपट्टी पुनर्वसन योजनेअंतर्गत पात्र झोपडपट्टी पुनर्वसनानंतर उपलब्ध होणाऱ्या 3 हजार 900 चौ. मी. मोकळ्या भूखंडावर एसआरएची इमारतीच्या बांधकामाच्या प्रस्तावास मंजुरी दिली आहे.
“झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाच्या इमारतीबाबतचा प्रस्ताव शासनाला सादर केला होता. त्यास शासनाने परवानगी दिली आहे. त्यामुळे प्राधिकरणाला स्वत:चे कार्यालय मिळणार आहे.” – नीलेश गटणे, मुख्य कार्यकारी अधिकारी एसआरए