औंध – बालेवाडी फाटा बाणेर येथे बालेवाडी हौसिंग फेडरेशनच्या नेतृत्वात नागरिकांनी जोरदार आंदोलन केले. पिण्याचे पाणी व इतर नागरी समस्या सोडवण्यासाठी भर पावसात भिजून यावेळी नागरिकांनी आपला रोष व्यक्त केला.पिण्याचे पाणी तसेच स्मार्ट सिटीने केलेली अर्धवट कामे, रस्त्यांची दुरावस्था, कचरा अशा अनेक नागरी समस्यांबाबत आंदोलन करून स्मार्ट सिटी प्रशासन व महानगरपालीका प्रशासकीय यंत्रणेचा निषेध यावेळी आंदोलनकर्त्यांनी केला.
यावेळी उपस्थितांनी प्रशासकीय यंत्रणे विरोधात नाराजी व्यक्त केली.तब्बल तासभर पावसात उभे राहत नागरिकांनी हे आंदोलन केले. यावेळी टँकर पासून मुक्ती मिळालीच पाहिजे, स्मार्ट सिटी इट्स जोक, अतिक्रमणाला पाठीशी घालणाऱ्याला धडा शिकवलाच पाहिजे, ये पब्लिक है सब जानती है, असे बॅनर दर्शवून घोषणा देण्यात आल्या.
सोसायटींना अजुनही पुरेसं पाणी मिळत नाही. रस्त्यांच्या समस्येवर देखील पुणे महापालिका आणि स्मार्ट सिटीला संपुर्ण माहिती दिली आहे. परंतु त्यांचा प्रतिसाद शून्य आहे. स्मार्ट सिटी व पुणे महापालिकेचे अधिकारी रस्त्याबाबत एकमेकांकडे बोट दाखवितात. नागरिकांच्या तक्रारींकडे अधिकारी दुर्लक्ष करतात. नागरिकांच्या ऑनलाईन तक्रारी काही न करता बंद केल्या जातात, असेही आंदोलना प्रसंगी नागरिकांनी सांगितले.
टँकर मुक्त बाणेर ,बालेवाडी मे – २३ च्या मध्यावर करण्याची घोषणा मनपा अधिकाऱ्यांनी उद्घाटने केली परंतु अजूनही अनेक सोसायटींना टॅंकर पाणी विकत घ्यावे लागते. याबाबत नागरिकांनी रोष व्यक्त केला. या आंदोलनानंतर प्रशासनाला जाग येणार की नाही, समस्या सुटणार नसतील तर भविष्यकाळात यापेक्षाही मोठे जन आंदोलन उभे करण्यात येईल असेही याप्रसंगी फेडरेशनच्या वतीने सांगण्यात आले.
स्मार्ट सिटीचे स्वप्न दाखवून बाणेर बालेवाडी परिसरातील नागरिकांची करण्यात आलेल्या फसवणुकीचा यावेळी नागरिकांनी तीव्र शब्दात निषेध व्यक्त केला. स्मार्ट सिटीने बाणेर बालेवाडी परिसरामध्ये करोडो रुपयाचा निधी उधळून अर्धवट कामे केली आहेत . स्मार्ट सिटीचे अनेक प्रकल्प निकृष्ट दर्जाचे असून अनेक प्रकल्प अर्धवट करून तसेच सोडले आहेत असा आरोप नागरिकांनी करून स्मार्ट सिटी प्रशासनाचा तीव्र शब्दात निषेध व्यक्त केला.
पुणे महानगरपालिकेतर्फे बाणेर बालेवाडी परिसरामध्ये टाकण्यात आलेल्या पिण्याच्या पाण्याच्या पाईप लाईनचे काम निकृष्ट दर्जाचे झाले असल्यामुळे वारंवार परिसरामध्ये पाईप फुटत आहेत व याचा नाहक त्रास परिसरातील नागरिकांना सहन करावा लागत आहे. अशा निकृष्ट काम करणाऱ्या ठेकेदारांवर कारवाई करण्याची मागणी यावेळी नागरिकांनी केली.
या आंदोलनात बालेवाडी वेल्फेअर फेडरेशन, बाणेर बालेवाडी पाषाण रेसिडेन्सी असोसिएशन सदस्य, बाणेर ,बालेवाडी ,पाषाण ,महाळूंगे परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.