कात्रज – “मूड इंडिगो” ही इंडियन इस्टिट्यूट ऑफ टेक्नोलॉजी, मुंबई (आय.आय.टी,बॉम्बे) यांनी आयोजित केलेल्या आंतर महाविद्यालयीन पथनाट्य स्पर्धेत “सत्यमेव जयते” हे नाटक सादर करून सिंहगड इन्स्टिट्यूटने नेत्रदीपक कामगिरी करत विजेतेपद पटकावले. ही स्पर्धा आशिया खंडातील सर्वात मोठी सांस्कृतिक स्पर्धा असून भारतातील अनेक महाविद्यालयांचा यामध्ये सहभाग असतो.
स्पर्धेचे हे 53 वे वर्ष होते. मूड इंडिगो अंतर्गत अनेक मोठ्या सांस्कृतिक स्पर्धांचे आयोजन देशभरात केले जाते.15 शहरांमध्ये पात्रता फेरी घेतली जाते व त्यातून अंतिम फेरीसाठी संघ निवड होते. यामध्ये आगाझ ही राष्ट्र पातळीवरील पथनाट्य (स्ट्रीट थिएटर) स्पर्धा असून 2023चे आगाझ प्रथम क्रमांकाचे विजेतेपद सिंहगड इन्स्टिट्यूटच्या कलामंडळने मिळवले, अशी माहिती सिंहगड कलामंडळचे प्रमुख वैभव वासणकर आणि मार्गदर्शक अपूर्वा चतुर्वेदी, प्रथमेश आहेरसिंग यांनी दिली.
संस्थेचे संस्थापक अध्यक्ष प्राध्यापक एम.एन.नवले, संस्थापक सचिव डॉ.सुनंदा नवले, उपाध्यक्षा डॉ.रचना नवले-अष्टेकर, उपाध्यक्ष रोहित नवले यांनी विद्यार्थ्यांचे कौतुक केले. यावेळी डॉ.ए.व्ही.देशपांडे, डॉ.एस.पी. पाटील, डॉ.आर.बी.पाटील, प्रा.आर.एच.बोऱ्हाडे, प्रा.अमृत पाटील, प्रा.रसिका कुलकर्णी, प्रा.सुमित माळी उपस्थित होते. या विद्यार्थी संघाचे नेतृत्व आदित्य शेलार, प्रिन्स राव, देवाशीष पाटील, रोहित तायडे, कैवल्य कुलकर्णी, साहिल पिंपळशेंडे यांनी केले.