पुणे – खराडी बायपास परिसरात पिस्तूलासह फिरणार्या सराईत गुन्हेगाराला विमानतळ पोलिसांनी अटक केली. आरोपीकडून एक पिस्तूल व एक जिवंत काडतूस जप्त करण्यात आले असून आरोपीवर यापूर्वी गंभीर स्वरुपाचे पाच ते सहा गुन्हे दाखल आहेत.
राकेश शंकर ठोकळ (२३, रा. वैदूवाडी, हडपसर) असे अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे. ठोकळ हा रेकॉर्डवरील गुन्हेगार आहे.
विमानतळ पोलीस ठाण्याचे पथक हद्दीत गस्तीवर होते. यादरम्यान खराडी बायपास परिसरात एकजण संशयितरित्या थांबला असून त्याच्याकडे पिस्तूल असल्याची माहिती अंमलदार शैलेश नाईक व सचिन जाधव यांना मिळाली. त्यानूसार पथकाने सापळा रचून ठोकळ याला ताब्यात घेतले. त्याची झडती घेतली असता त्याच्याकडे एक पिस्तूल व एक जिवंत काडतूस आढळून आले.
तपासात त्याने अवैधरित्या विनापरवाना पिस्तूल बाळगल्याचे समोर आले असून पोलिसांच्या पथकाने त्याला अटक केली. त्याने हे पिस्तूल नेमके कोठून आणले, याबाबत विमानतळ पोलीस तपास करत आहेत. विमानतळ पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक आनंदराव खोबरे, गुन्हे निरीक्षक संगिता माळी यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक निरीक्षक विजय चंदन, अंमलदार सचिन कदम, अंकुश जोगदंडे, दादासाहेब बर्डे, राकेश चांदेकर यांच्यासह पथकाने ही कामगिरी केली.