पुणे – खराडी भागात मसाज पार्लरच्या नावाखाली सुरू असलेल्या वेश्याव्यवसायावर गुन्हे शाखेच्या सामाजिक सुरक्षा विभागाने छापा टाकला. या कारवाईत पोलिसांनी ३ महिलांची सुटका केली आहे. महिलांना वेश्याव्यवसायास प्रवृत्त केल्याप्रकरणी स्पा मॅनेजरला अटक करण्यात आली.
सुरेश दीपक इंगळे ( २८, रा. प्रगतीनगर, काळेपडळ, हडपसर) असे अटक करण्यात आलेल्या स्पा मॅनेजरचे नाव आहे. याबाबत सामाजिक सुरक्षा विभागाच्या पोलीस हवालदार रेश्मा कंक यांनी चंदननगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध कायदा १९५६च्या कमल ३,४,५ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या कारवाईत १ लाख १० हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गुन्हे शाखेच्या सामाजिक सुरक्षा विभागाच्या पथकाला बुधवारी बातमीदारामार्फत माहिती मिळाली होती की, ग्रांट रोड कमर्शील झोन गेरा इम्पेरियम अल्फा खराडी येथील तिसऱ्या मजल्यावर द रिलिफ स्पामध्ये मसाज पार्लरच्या नावाखाली वेश्याव्यवसाय सुरू आहे. त्याठिकाणी बनाट ग्राहक पाठवून खात्री केली असता, तेथे वेश्या व्यवसाय सुरू असल्याचे समजले.
पोलिसांच्या पथकाने तेथे छापा टाकून ३ महिलांना ताब्यात घेतले. मसाज पार्लरच्या नावाखाली महिलांना वेश्याव्यवसायास प्रवृत्त केल्याप्रकरणी स्पा मॅनेजर सुरेश इंगळे याला अटक करण्यात आली.
स्पा मॅनेजर सुरेश इंगळे पीडित महिलांना पैशाचे आमिष दाखवून त्यांना वेश्या व्यवसायासाठी प्रवृत्त करून मसाज सेंटरच्या नावाखाली त्यांच्याकडून वेश्याव्यवसाय करून घेत असल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे. याप्रकरणाचा पुढील तपास पोलीस निरीक्षक (गुन्हे) पंडित रेजितवाड करत आहेत. ही कामगिरी पोलीस उपायुक्त अमोल झेंडे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक भरत जाधव आणि पथकाने केली.