नवी दिल्ली : देशातील इंधनाचे दर आज पुन्हा एकदा वाढवण्यात आले आहेत. देशभरामध्ये आज इंधनाचे दर प्रति लिटरमागे ८० पैशांनी वाढले आहे. विशेष म्हणजे या दरवाढीमुळे आतापर्यंत १०० रुपये लिटरच्या आत असणाऱ्या डिझेलच्या दरांनी मुंबईमध्ये १०० चा टप्पा ओलांडला आहे. त्यामुळे सर्वसामान्यांच्या खिशाला पुन्हा एकदा झळ बसत आहे.
जागतिक बाजारपेठात कच्च्या तेलाच्या भावात मोठी घसरण झाली आहे. कच्च्या तेलाचे भाव 108 डॉलर प्रति बॅरलवर पोहचले आहेत. तरीही भारतात पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीत वाढ होत असल्याचे दिसत आहे. आज पेट्रोल-डिझेलच्या दरात 80 पैशांनी वाढ होणार आहे. 22 मार्चपासून देशात इंधन दरवाढ सुरुच आहे. त्यामुळे राजधानी दिल्लीमध्ये बुधवारी पेट्रोल 101.01 रुपये प्रति लीटर तर डिझेल 92.27 रुपये प्रतिलीटर मिळणार आहे. मागील 9 दिवसातील ही आठवी इंधन दरवाढ आहे.
पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीत सातत्याने वाढ होत आहे. यावरुन विरोधीपक्षाने केंद्र सरकारवर टीकास्त्र सोडले. वाढत्या इंधनाच्या दरावर केंद्र सरकारने स्पष्टीकरण दिले आहे. अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी मंगळवारी राज्यसभेत इंधन दरवाढीवर मौन सोडले. इंधनाच्या वाढत्या किंमती आपल्यासाठी एक मोठं आव्हान आहे. अर्थ विधेयकावर चर्चा करताना सीतारमण यांनी म्हणाल्या की, 2010-11 पासून 2021-22 पर्यंत पेट्रोल आणि डिझेलवरील सेस साठी केंद्र सरकारने 11.37 लाख कोटी रुपये खर्च केले असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.