मांजरी – उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पुन्हा एकदा शरद पवार यांच्यासह बैठकीला उपस्थित राहणे टाळल. वसंतदादा शुगर इन्स्टिटयूट येथे ४७ वी सर्वसाधारण सभा आयोजित करण्यात आली होती. या सर्वसाधारण सभेपूर्वी नियामक मंडळाची बैठक झाली. या बैठकीच्या ठिकाणी वसंतदादा शुगर इन्स्टिटयूटचे अध्यक्ष शरद पवार, राज्याचे मंत्री दिलीप वळसे पाटील, प्रदेशाध्यक्ष आमदार जयंत पाटील, आमदार रोहित पवार यांच्यासह अनेक सदस्य उपस्थित राहिले.
या बैठकीला अजित पवार येणार असल्याचेही सांगण्यात आले होते. मात्र, ऐनवेळी पुन्हा एकदा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शरद पवार यांच्यासोबत बैठकीला येणे टाळले, अशीच चर्चा पदाधिकारी, कार्यकर्त्यांत आहे. यातून इन्स्टिटयूटच्या अधिकाऱ्यांची मात्र पंचाइत होत असल्याचे निदर्शनास आले.
सहा महिन्यापूर्वी अजित पवार हे मुख्यमंत्री शिंदे, उपमुख्यमंत्री फडणवीस यांच्या सोबत जाऊन उपमुख्यमंत्री पदावर विराजमान झाले आहे. त्या घटनेनंतर आज अखेरपर्यंत ज्या कार्यक्रमाच्या ठिकाणी शरद पवार असतील. त्या ठिकाणी अजित पवार हे व्यासपीठावर जाण्याचे टाळत असल्याचे दिसत आहे. मात्र, वसंतदादा शुगर इन्स्टिटयूट येथील कार्यक्रम आणि बैठक असली की अजित पवार आवर्जून उपस्थित राहतात. परंतु, राज्यातील सत्तेत सहभागी झाल्यावर अजित पवार यांनी शरद पवार यांच्या सोबत येणे त्या-त्यावेळी टाळले आहे. यावर खरपूस राजकीय चर्चा मात्र रंगली आहे.