पोलिसांकडुन काहीना चोप, प्रबोधन आणि नाकाबंदीही
पुणे : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शहरात संचारबंदी लागू असतानाही मंगळवारी नागरीकांनी त्याचे उल्लंघन करीत भाजीपाला, गुढ़ीपाडव्याच्या खरेदीसाठी बाजारात मोठ्या प्रमाणात गर्दी केली. काही ठिकाणी पोलिसांनी नागरीकांना माघारी जाण्यास सांगितले, तर बहुतांश गर्दीच्या ठिकाणी पोलिस फिरकलेच नाही़.
दरम्यान पोलिसांनी काही ठिकाणी विनाकारण फिरणाऱ्याना चांगलाच चोप दिला. तर काही ठिकाणी नागरीकांना गर्दीच्या ठिकाणाहुन तत्काळ घरी जाण्यास सांगितले. याबरोबरच गर्दीवर नियंत्रण आणन्यासाठी 100 हुन अधिक ठिकाणी नाकाबंदी केली.
शहरामध्ये कोरोना विषाणुचा प्रादुर्भाव वाढत जाऊ नये यासाठी राज्य सरकारच्या आदेशानुसार, सोमवारी जमावबंदीचा आदेश देण्यात आला. मात्र नागरीकांनी जमावबंदीचा आदेश झुगारुन लावत मोठ्या प्रमाणात गर्दी केली. त्यामुळे पोलिसांनी पुन्हा अत्यावश्यक सेवा वगळता सर्व वाहनाना वाहतुकीसाठी बंदी घातली.
त्यामुळे सोमवारी सायंकाळी रस्त्यावरील गर्दीवर काही प्रमाणात नियंत्रण आले. मात्र बुधवारी असलेला गुढ़ीपाडवा व बंदीच्या भितीमुळे भाजीपाला, किराणा आदी वस्तु खरेदी करण्यासाठी किराणा दुकाने, महात्मा फुले मंडई, मार्केट यार्ड भाजी मंडईसह शहराच्या उपनगरामधील भाजी मंडई, मॉलमधील किराणा विभाग,भाजी विभागमध्ये गर्दी केली.