पुणे – बालकांच्या शिक्षण हक्क कायद्यानुसार दिल्या जाणार्या २५ टक्के आरक्षित जागांवरील प्रवेशासाठी ‘आरटीई’ ऑनलाइन प्रवेश प्रक्रिया राबवली जाते. त्याच्या तयारीला प्राथमिक शिक्षण विभागाने सुरुवात केली आहे. त्यामुळे आवश्यक कागदपत्रे जमा करण्याची तयारी पालकांना सुरू करावी लागणार आहे.
‘आरटीई’ अंतर्गत वंचित व आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील विद्यार्थ्यांना इंग्रजी माध्यमाच्या विना अनुदानित शाळांमध्ये २५ टक्के जागांवर प्रवेश दिला जातो. दर वर्षी त्यासाठी ऑनलाइन प्रवेशप्रक्रिया राबवली जाते. प्रवेशासाठी उपलब्ध जागांच्या तुलनेत सुमारे ३ ते ४ पट अर्ज दाखल होत असतात. त्यानंतर ऑनलइन लॉटरी काढून विद्यार्थ्यांना प्रवेश दिले जातात.
‘आरटीई’ प्रवेशात प्रवेशप्रक्रियेत काही बदल आहे का, किंवा जुन्याच पद्धतीने अंमलबजावणी करायची यासंदर्भात राज्य सरकारला अधिवेशनानंतर विचारणा केली जाईल. त्यानंतर प्रवेशप्रक्रियेच्या अंमलबजावणीला सुरुवात केली जाणार आहे. आरटीई प्रवेशासाठी शाळा नोंदणी करणे, ऑनलाईन यंत्रणेची तपासणी करणे, पालकांना आवश्यक दाखले काढून ठेवण्याचे आवाहन करणे, पालकांमध्ये प्रवेशासंदर्भात जागृती करणे आदींबाबत प्राथमिक तयारी केली जात आहे.
प्रक्रिया वेळेत पूर्ण व्हावी
शालेय शिक्षण विभागातर्फे आरटीई प्रवेशप्रक्रिया उशिरा सुरू केली जाते. त्यामुळे आरटीईचे विद्यार्थी इतर विद्यार्थ्यांच्या तुलनेत अभ्यासात मागे राहतात. या वर्षी प्रवेशप्रक्रिया नियोजित कालावधीत पूर्ण करावी, अशी अपेक्षा पालकांकडून व्यक्त केली जात आहे.