सिंहगडरस्ता – संतोष हॉल ते सन सिटी या दरम्यान रस्ता रूंदीकरण करण्यात आले. पदपथही तसेच दुभाजक असल्याने प्रशस्त मार्ग तयार झाला. परंतु, या रस्त्याच्या पदपथासह दुतर्फा चारचाकी तसेच काही ठिकाणी अवजड वाहने उभी केली जात असल्याने रूंदीकरणानंतरही हा रस्ता अपुरा पडू लागला आहे.
या रस्त्यावर “पार्किंग’ नसतानाही वाहने उभी केली जात असताना वाहतूक पोलिसांकडून कुठलीही कारवाई केली जात नाही. त्यामुळे जागा दिसेल त्या ठिकाणी पार्किंग अशी पद्धत येथे अवलंबली जात आहे. अनेक ठिकाणी एक-दोन आठवडे वाहने तशीच थांबून असतात. अवजड वाहनांचालकांनीही या रस्त्यावरील काही जागा “ताब्यात’ घेतल्या असून दोन-दोन दिवस वाहन उभे असते. रस्ता रूंदीकरणातून या परिसरातील नागरिकांनी समाधान व्यक्त केले होते.
परंतु, हा रस्ता म्हणजे प्रशासनाने केलेली फुकटीची पार्किंगची सोय अशी ओळख आता या परिसराची झाली आहे. त्यामुळे वाहतूक पोलिसांनी सदर बाब गांभीर्याने घेत रस्त्यावर पार्किंग करणाऱ्या वाहनचालकांवर कारवाई करावी तसेच या ठिकाणी वाहतूक पोलिसाची नेमणूक करावी, अशी मागणी स्थानिक नागरिकांकडून होत आहे.
सन सिटी भागामध्ये रस्त्यावर नागरिक वाहने उभी करतात त्यामुळे वाहतुकीला अडथळा निर्माण होतो. पी वन आणि पी टू फलकासाठी आम्ही क्षेत्रीय कार्यालयाशी पत्रव्यवहार केला आहे. एकदा फलक लागले की त्यानुसार कारवाई करता येईल. – पांडुरंग वाघमारे, सहायक पोलीस निरीक्षक, वाहतूक शाखा, सिंहगड रस्ता