पुणे – गेल्या दीड वर्षांपासून शहरात सातत्याने ड्रेनेज आणि पाणीपुरवठा विभागाकडून खोदकामे सुरू आहेत. या दोन्ही विभागांना खोदाईसाठी महापालिका आयुक्तांनी 31 मेपर्यंत मुदतवाढ दिली आहे. हे काम बंद झाल्यानंतर ऐन पावसाळ्याच्या तोंडावर प्रशासन 7 जूनपर्यंत रस्त्यांची दुरुस्ती करणार आहे. त्यासाठी 65 कोटींच्या निविदाही काढण्यात आल्या आहेत.
पाणीपुरवठा, मैलापाणी शुद्धीकरण विभागाकडून नव्या वाहिन्या टाकण्याचे काम केले जात आहे. गेल्या वर्षभरापासून हे खोदकाम सुरू आहे. बाजीराव रस्ता, शिवाजी रस्ता, नेहरू रस्ते, टिळक रस्ता परिसरात अजूनही कामे सुरू आहेत. आयुक्तांनी यापूर्वी रस्ते खोदाईसाठी 30 एप्रिल मुदत होती. मात्र, या दोन्ही विभागांनी ही मुदत 15 मेपर्यंत वाढवून मागितली होती. मात्र, त्यानंतरही कामे पूर्ण न झाल्याने आता 31 मेपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. त्यानंतर तातडीने रस्ते दुरुस्ती कामे हाती घेण्यात येणार असल्याचेआयुक्त विक्रम कुमार यांनी सांगितले.
कामे पूर्ण करण्यासाठी यापूर्वी तारीख दिली होती. पण, अजून महिनाभर कामे चालतील आणि ती आताच मार्गी लावणे आवश्यक आहे. त्यामुळे आता ही मुदत वाढवली आहे. लक्ष्मी रस्ता, टिळक रस्ता, बाजीराव रस्ता, शिवाजी रस्ता आणि कुमठेकर रस्ता, केळकर रस्ता, नेहरू रस्ता या सह उपनगरांमधील रस्त्याचे काम 7 जूनपूर्वी पूर्ण करण्यात येणार असल्याचे आयुक्तांनी स्पष्ट केले.