पुणे (कल्याणी फडके) पर्यावरणपूरक आणि परवडणारे इंधन, असा प्रचार करण्यात आलेल्या सीएनजीच्या (कॉम्प्रेस्ड नॅचरल गॅस) दराचा आलेखही मागील वर्षभरापासून चढता असल्याचे चित्र आहे. त्यामुळे सीएनजी इंधन वापरावे की नाही, असा प्रश्न नागरिक उपस्थित करीत आहेत. तर, यामुळे पर्यावरणपूरक वाहतुकीला प्रोत्साहन देण्याच्या उद्दीष्टाला फटका बसण्याची भीती वर्तविण्यात येत आहे.
पेट्रोल आणि डिझेलच्या दरवाढीमुळे अनेक नागरिकांनी सीएनजीचा (कॉम्प्रेस्ड नॅचरल गॅस) पर्याय निवडला. मात्र, आता सलग सीएनजीच्या दरात देखील दरवाढ झाली आहे. पुणेकरांना एका किलोमागे 66 रुपये मोजावे लागत आहेत. जून 2021 ते जानेवारी 2022 या कालावधीत सीएनजीच्या दरात 10 रुपयांनी वाढ झाली आहे. जून 2021 मध्ये 56.60 रुपये इतका दर आकारला जात होता. मात्र, अवघ्या सात महिन्यांमध्ये 10 रुपयांनी दरवाढ झाली आहे. सीएनजीचे दर सतत वाढत असल्याने आता सीएनजी देखील तुलनेने महाग वाटत आहे. शहरातील वाढती वाहन संख्या, वाहतूक कोंडी, सीएनजीचा पुरवठा, इलेक्ट्रीक वाहनांचा पर्याय त्यामुळे आता ई-वाहन वापरावे, असे वाटत आहे, असे मत ओंकार देसाई यांनी व्यक्त केले.
रिक्षा चालकांना देखील फटका…
शहरात सुमारे 70 हजारांहून अधिक रिक्षा आहेत. या रिक्षांना एका किलोमागे सुमारे 35 किलोमीटरचे “ऍव्हरेज’ मिळते. त्यामुळे इंधन दरातील भाववाढीचा फटका रिक्षाचालकांना देखील बसत आहे. शहरात वाहतूक करताना वाहतूक कोंडीची देखील भर यामध्ये पडत असल्याने अधिक इंधन लागत असल्याचे रिक्षाचालक सांगतात.
पेट्रोलच्या तुलनेने हे परवडणारे असले तरी देखील, सध्याच्या व्यवसायातील उत्पन्नाच्या तुलनेने हा खर्च अधिक आहे. करोनामुळे रिक्षाचा व्यवसाय निम्म्याहून कमी झाला आहे. काही वेळा प्रवासी नसताना रिकामी धाव घ्यावी लागते, त्यामुळे ही दरवाढ रिक्षाला परवडणारी नाही. इंधनाच्या दरात वाढ झाल्यास रिक्षा मीटर दरवाढीची मागणी करता येते.
मात्र, एकीकडे उत्पन्न नसताना, दरवाढीच्या मागणीने पुन्हा व्यवसायावर परिणाम होणार आहे. सध्या रिक्षाचालक कात्रीत सापडला आहे. वर्षभरात बारा रुपयांनी सीएनजीच्या दरात वाढ झाली आहे. रिक्षा ही प्रवासी वाहतूक सुविधा आहे. याच्या विविध बाबींकडे सरकारचे नियंत्रण असते. त्यामुळे सरकारने रिक्षा चालकांना लावण्यात येणाऱ्या करात कपात करणे आवश्यक असल्याचे रिक्षा पंचायतचे सचिव नितीन पवार म्हणाले.
सीएनजीमध्ये होणारी दरवाढ अनपेक्षित आहे. याबाबत कोणतीही पूर्वसूचना देण्यात आली नव्हती. पर्यावरणपूरक इंधन मानले जाणाऱ्या सीएनजीच्या दरात वाढ केल्याने सर्वसामान्य नागरिकांवर याचा परिणाम होणार आहे. त्यामुळे सीएनजीच्या वापर करण्याबाबत संभ्रम निर्माण होण्याची शक्यता आहे.
– अली दारुवाला, अध्यक्ष,
ऑल इंडीया पेट्रोल -डिझेल डिलर्स असोसिएशन