पुणे – शालेय शिक्षण विभागाच्या विविध कार्यालयातील वरिष्ठ अधिकाऱ्यांऐवजी लिपिक संवर्गातील कर्मचाऱ्यांच्या जन माहिती अधिकारी म्हणून नियुक्त्या करण्यात आलेल्या आहेत. यामुळे कर्मचाऱ्यांच्या अवस्थता पसरली आहे. याला कर्मचारी संघटनेकडून तीव्र विरोध दर्शविण्यात येत असून, या नियुक्त्या रद्द करण्याची मागणी होत आहे.
सार्वजनिक प्राधिकरणाच्या नियंत्रणाखालील माहिती नागरिकांना मिळवता यावी, यासाठी संबंधित कार्यालयातील कामाचा पुरेसा अनुभव व दर्जा असणाऱ्या योग्य अधिकाऱ्यांची जन माहिती अधिकारी, प्रथम अपिल अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात यावी, असे सुस्पष्ट निर्देश राज्य माहिती आयोगाने दिलेले आहेत. त्यानुसार राजपत्रित दर्जा असणाऱ्या अ, ब या गटातील अधिकाऱ्यांचीच नेमणूक ही जन माहिती अधिकारी, प्रथम अपिल अधिकारी म्हणून करता येणार आहे.
मात्र, हे निर्देश विचारात न घेता शिक्षण विभागाच्या विविध कार्यालयांत माहिती अधिकारात प्राप्त झालेल्या अर्जांवर लेखी पत्राद्वारे माहिती देण्यासाठी लिपिक संवर्गातील सहायक अधीक्षक, मुख्य लिपिक पदावर काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना जन माहिती अधिकारी म्हणून नियुक्त केलेले आहे. मुदतीत माहिती न दिल्यास संबंधित कर्मचाऱ्यांवर दंडात्मक कारवाईही केली जाते, असे सांगण्यात आले.
वरिष्ठ दर्जाच्या अधिकाऱ्यांना वगळून लिपिक संवर्गातील कर्मचाऱ्यांच्या जन माहिती अधिकारी पदावर करण्यात आलेल्या नियुक्त्या या राज्य माहिती आयोगाच्या निर्देशांचे उल्लंघन करणाऱ्या ठरत आहेत. त्यामुळे या नियुक्त्या रद्द करण्यात याव्यात, अशी मागणी शिक्षण आयुक्तांकडे करण्यात आलेली आहे. त्यांच्याकडून त्यावर सकारात्मक प्रतिसाद मिळण्याची अपेक्षा आहे.
– नाना वाघ, अध्यक्ष, पुणे शहर शिक्षण
खाते तृतीय श्रेणी राज्य सरकारी कर्मचारी संघटना