पुणे – पुढील आर्थिक वर्षाचे महापालिकेचे अर्थसंकल्प आयुक्त विक्रम कुमार आज सादर करणार आहेत. हा अर्थसंकल्प पुणेकरांना ऑनलाईन पाहता येणार आहे. महापालिकेकडून ही सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे.
महापालिका आयुक्त विक्रम कुमार आज सकाळी ११:०० वाजता महानगरपालिकेच्या मुख्य सभेत सन २०२१-२०२२ चा अर्थसंकल्प सादर करणार आहे. याचे थेट प्रक्षेपण पुणे मनपाच्या https://pmc.gov.in या संकेतस्थळ आणि https://facebook.com/PMCPune या फेसबुक पेजवर करण्यात येणार आहे.
दरम्यान, महापालिकेचे 2020-21 या आर्थिक वर्षांचे अंदाजपत्रक करोनाच्या संकटात गेले आहे. या कालावधीत महापालिकेचे उत्पन्न घटल्याने मार्च अखेरपर्यंत पालिकेकडून या आर्थिक वर्षात केवळ 20 ते 25 टक्केच विकासकामे केली जाणार आहेत. त्यातच, 2019-20 या आर्थिक वर्षाच्या सुमारे 700 कोटींच्या बिलांची थकबाकीही पालिकेकडून 2020-21 च्या अंदाजपत्रकातून देण्यात आली आहेत. त्यामुळे महापालिकेच्या जमाखर्चाचा ताळमेळ बघता आयुक्तांच्या अंदाजपत्रकाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. त्यातच, पालिका हद्दीत नव्याने 23 गावे समाविष्ट होत असल्याने या गावांच्या विकासासाठी आयुक्त किती निधी देणार, याकडेही या गावांचे लक्ष लागले आहे.
…म्हणून अंदाजपत्रकास उशीर
पुढील आर्थिक वर्षाचे अंदाजपत्रक आयुक्तांकडून दरवर्षी 15 ते 17 जानेवारीदरम्यान सादर होते. मात्र, राज्य शासनाने महापालिका हद्दीत 23 गावे समाविष्ट करण्याची अधिसूचना 23 डिसेंबर रोजी जाहीर केली. त्यावर हरकती आणि सूचना मागवल्या असून, 23 जानेवारीपर्यंत मुदत आहे. त्यामुळे, अंदाजपत्रक सादर झाले आणि त्यानंतर 23 गावे आल्यास त्यांच्यासाठी निधीची तरतूद करणे अडचणीचे होईल. त्यामुळे गावे आल्यानंतर त्यांच्यासाठीचा प्राथमिक खर्च लक्षात घेऊन अंदाजपत्रकात त्यासाठी तरतूद केली जाणार आहे. त्यामुळे आयुक्तांकडून स्थायी समितीकडे 29 जानेवारीपर्यंतची मुदतवाढ मागण्यात आली होती. त्यास समितीने मान्यता दिली आहे.