पुणे – राज्यातील विद्यापीठांतील घटनात्मक पदांना पदभरतीवरील निर्बंधांतून सवलत देण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय वित्त विभागाने घेतला आहे. आता विद्यापीठांतील मंजूर १३ विविध घटनात्मक पदांच्या भरतीचे अधिकार कायमस्वरुपी संबंधित विभागांना देण्यात आले आहेत. त्यामुळे विद्यापीठांतील कुलगुरू, कुलसचिव आदी पदांची भरती जलद गतीने होणार आहे.
याबाबतचा शासन निर्णय राज्य शासनाच्या वित्त विभागाने आज प्रसिद्ध केला. महाराष्ट्र विद्यापीठ अधिनियम २०१६ मधील कलम १० नुसार विद्यापीठांकरीता विविध १३ घटनात्मक पदांची तरतूद करण्यात आली आहे. ही पदे कालमर्यादा असलेली असून, कमाल पाच वर्षांसाठी नियुक्ती केली जाते. या पदावरील व्यक्तींचा कार्यकाल संपुष्टात आल्यामुळे किंवा पदाचा राजीनामा दिल्यामुळे अशी पदे वेळोवेळी रिक्त होतात.
रिक्त झालेल्या पदांच्या भरतीसाठी वित्त विभागाची मान्यता घ्यावी लागते. मात्र या प्रक्रियेस काही काळ लागत असल्याने विद्यापीठांचे कामकाज सुरळीत सुरू राहण्यात अडचणी येतात, या घटनात्मक पदांची आवश्यकता असल्याचे वित्त विभागाच्या निदर्शनास आणून देण्यात आले.
या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र विद्यापीठ अधिनियम २०१६ चे कलम १० अन्वये विद्यापीठांकरीता मंजूर असलेल्या १३ विविध घटनात्मक पदे भरण्यासाठी वित्त विभागाच्या पदभरतीवरील निर्बंधासंबंधीत आदेशातून सूट देऊन घटनात्मक पदे पदे भरण्याचे कायमस्वरुपी अधिकार त्या विभागांनाच देण्यात येत असल्याचे स्पष्ट करण्यात आले. त्यामुळे राज्यातील विद्यापीठांना मोठा दिलासा मिळाला आहे.