दीपक येडवे
वीसगाव खोरे – वीसगाव खोरे, दि. २९ – भोलावडे, (ता. भोर) येथील प्रगतशील शेतक-याने तीस गुंठ्यात कारल्याचे पीक घेतले असून, आतापर्यंत १२ तोडे झाले असून, दर तोड्यास सरासरी १२० किलो फळे मिळत आहेत. यातून किलोला सरासरी ४० रुपये दर मिळतो आहे. जानेवारी महिन्यांपर्यंत अजून ७ तोडे होण्याची अपेक्षा असून, या कडू कारल्यांतून या शेतक-याला चांगले उत्पन्न मिळत आहे.
भोलावडे, (ता. भोर) येथील प्रगतशील सूर्यकांत बाबुराव काळे यांनी एसआरटी या अत्याधुनिक पद्धतीने कारल्याचे पीक घेण्यासाठी कामथडी येथील नर्सरीमधून मिडोरिलॉंग वाणाची ३ हजार ८०० रोपे आणली. रोपांची लागण करण्यापूर्वी गांडुळ खतांचा २५ गोणीचा बेसल डोस दिला.
तयार गादी वाफ्यावर दोन ओळीत ५ फुट व २ वेलीत २ फुट अंतर ठेवून आक्टोबरमधील दुस-या आणि चौथ्या आठवड्यात दोन टप्प्यांत लागवड केली. यानंतर रोज दोन तास ठिबकने पाणी दिले. गो-कृपा अमृतचा ५०० लीटरचा डोस दिला. रोप लावल्यानंतर दर चार दिवसांनी गोकृपा अमृत, देशी गाईचे गो-मूत्राची फवारणी केली. बेणणी केली,
आठ दिवसांनी दशपर्णी अर्काची फवारणी केल्याने कीड नियंत्रणात आली. तारकाठीने दोन आठवड्यानंतर कारल्याचे वेल बांधण्यास सुरुवात केली. वेल वाढीला लागल्यावर रोज वेल बांधणे सुरू केले. ४५ दिवसांनंतर चार दिवसांत एकदा कारल्याचा तोडा सुरू करण्यात आला.
तारकाठीच्या मंडपाने फळांच्या उत्पादनात वाढ
कारली हे वेलवर्गीय पीक असल्याने जमिनीवरच वेल पसरल्यास मर्यादित फुटवे येतात. त्यांचा परिणाम फळ उत्पादनावर होतो. यासाठी वेलींना आधार दिल्याने वाढ चांगली होऊन नवीन फुटवे येऊन फळधारणा चांगली होत आहे. या मंडपाने फळे जमिनीपासून पाच ते सहा फूट उंचीवर वाढत असल्याने वेल ,पाने, फळे यांचा जमिनीशी संपर्क न आल्यामुळे ओलावा लागून ती सडत नाहीत, कीड व रोगांचे प्रमाण कमी झाले. फळे लोंबकळती राहिल्यामुळे त्यांची वाढ सरळ होते.
फळांचा रंग चमकदार गडद हिरवा व टोकाकडे फिकट असून, आकार आणि आवरणाचा खरबडीतपणा, बिया मऊ आणि पांढऱ्या असल्याने कारल्याला मागणी जास्त आहे. शेवाळवाडी (सासवड) येथील मार्केटमध्ये घाऊक विक्री केली जाते. कारल्याच्या उच्च प्रतीमुळे दर चांगला मिळतो आहे.
– सूर्यकांत काळे, प्रगतशील शेतकरी भोलावडे (ता.भोर