महावितरण उपकार्यकारी अभियंत्यांचा मनमानी कारभार
मंचर – महावितरणच्या मंचर (ता. आंबेगाव) उपविभागाचे उपकार्यकारी अभियंता अनिलकुमार डोंगरे यांच्या मनमानी कारभाराविरुद्ध विविध संघटनांच्या वतीने मंचर विभागीय कार्यालयासमोर द्वारसभा घेऊन आंदोलन करण्यात आले
संयुक्त कृती समिती त्यामध्ये सबऑर्डिनेट इंजिनियर्स असोसिएशन, महाराष्ट्र स्टेट इलेक्ट्रिसिटी वर्कर्स फेडरेशन, तांत्रिक कामगार युनियन 5059, विद्युत क्षेत्र तांत्रिक कामगार युनियन 1029, मागासवर्गीय विद्युत कर्मचारी संघटना, महाराष्ट्र वीज कामगार महासंघ, महाराष्ट्र वीज कंत्राटी कामगार संघ यांनी मंचर उपविभागाचे उपकार्यकारी अभियंता डोंगरे यांनी शाखा अभियंता तांत्रिक कर्मचारी लेखा वाचताना कर्मचारी यांना मानसिक त्रास देत आहेत,
तसेच खासगी एजंट कंपनीच्या कामात सहभाग करून कर्मचारी व अधिकारी तसेच वीज ग्राहकांना त्रास देत आहेत. अनेक ग्राहकांनी विभागीय कार्यालयात लेखी तक्रारी दिलेल्या आहेत, त्यामुळे कंपनीची प्रतिमा जनमानसात मलिन झाली आहे. त्याचा परिणाम कंपनीच्या दैनंदिन कामकाजावर होत असल्याने सर्व अधिकारी व कर्मचारी मंचर उपविभाग यांनी त्यांच्यासोबत काम करण्याची मानसिकता नसल्याचे सह्यांचे निवेदन कार्यकारी अभियंता बांगर यांना दिले व कार्यवाही करून बदली करण्याची मागणी करण्यात आली.
तीन दिवसांत बदली न झाल्यास आंदोलन
याबाबत वेळोवेळी लेखी व तोंडी कळवूनही महावितरण प्रशासन त्यांचे वर कार्यवाही करीत नसल्याने सर्व कामगार व अधिकारी यांना लोकशाही मार्गाने आंदोलन करण्याचा निर्णय घ्यावा लागला. असे संघटना पदाधिकाऱ्यांच्या वतीने सांगण्यात आले. तीन दिवसांत बदली न झाल्यास पुढे तीव्र स्वरूपाचे एक दिवसीय साखळी आंदोलन 2 जानेवारी 2024 पासुन सुरू होऊन ते 03 जानेवारी 2024 पासून मंचर उपविभाग काम बंद आंदोलन सुरू करण्याचा इशारा देण्यात आला आहे.