प्रभात वृत्तसेवा पुणे, दि. 10 – हडपसर परिसरातील एका शाळेत अनधिकृतपणे विद्यार्थ्यांची वाहतूक करणाऱ्या पाच बस पुणे प्रादेशिक परिवहन विभागाने जप्त केल्या आहेत. या पाचही बस एकाच मालकाच्या असून त्याच्यावर दंडात्मक करवाई करण्यात आली असल्याची माहिती उपप्रादेशिक परिवहन अधिकारी डॉ. संजीव भोर यांनी दिली.
हडपसर येथील एका शाळेतील विद्यार्थ्यांची वाहतूक करणाऱ्या बसला मंगळवारी (दि.9) सकाळी आग लागून ती जळून खाक झाली होती. त्यावेळी त्या बसला शालेय वाहतूकीचा परवाना नसल्याचे आढळून आले होते. तसेच, त्या बससोबत असलेल्या इतर पाच बसमधून देखील विद्यार्थ्यांची वाहतूक केली जात असल्याचे समजले होते. त्यानुसार आरटीओच्या पथकाने बुधवारी सकाळी विद्यार्थ्यांची वाहतूक करताना या पाच बस पकडल्या. या बस जप्त करून त्या शेवाळेवाडी डेपोमध्ये नेण्यात आल्या. त्यांच्याकडून विनापरवाना विद्यार्थी वाहतूक केली जात असल्याने दंड वसूल करण्यात येणार आहे. दंडाची रक्कम भरल्यानंतर त्यांना सोडण्यात येणार आहे.
मात्र, परवाना मिळेपर्यंत या बसमधून विद्यार्थ्यांची वाहतूक करणार नसल्याचे हमीपत्र त्यांच्याकडून लिहून घेतले जाणार आहे. हडपसर परिसरात विना परवाना विद्यार्थ्यांची वाहतूक करणाऱ्या बसला आग लागल्यानंतर आरटीओने बुधवारपासून जोरदार कारवाई सुरू केली आहे. चार पथकाच्या माध्यमातून ही कारवाई केली जात आहे. या चार पथकामध्ये प्रत्येकी चार ते पाच अधिकाऱ्यांची नेमणूक केली असून याद्वारे अवैध शालेय वाहतूक करणाऱ्या बसवर कारवाई केली जाणार आहे.
पुणे, पिंपरी-चिंचवडमधील स्थिती
शालेय वाहतूक करणाऱ्या एकूण बस6 हजार 209
फक्त शालेय वाहतूक करणाऱ्या व्हॅन5 हजार 600
विद्यार्थी आणि कामगार वाहतूक540
इतर छोट्या-मोठ्या व्हॅन69
योग्यता प्रमाणपत्र घेतलेल्या व्हॅन70 टक्के
विद्यार्थ्यांची वाहतूक करणाऱ्या बसवर 12 दिवसांपासून कारवाईची मोहीम सुरू आहे. आतापर्यंत 121 बसवर कारवाई करून त्यांच्याकडून पाच लाख 69 हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे. यामध्ये प्रामुख्याने शालेय वाहतुकीचा परवाना न घेणे, योग्यता प्रमाणपत्र न घेणे, विमा न उतरविणे अशा स्वरुपाच्या कारवाई आहेत.
– डॉ. संजीव भोर,
उपप्रादेशिक परिवहन अधिकारी