प्रभात वृत्तसेवा पुणे, दि. 10 – सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या “हर घर तिरंगा’ आणि “स्वराज्य महोत्सवा’ला राज्यभरातून मोठा प्रतिसाद मिळत असून आतापर्यंत 30 हजारहून अधिक विद्यार्थी, शिक्षक, नागरिक अशा सर्वांनी राष्ट्र ध्वजासोबत आपले फोटो काढून विद्यापीठाच्या लिंकवर अपलोड केले आहेत.
या फोटोंच्या माध्यमातून सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ “गनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड’ करण्याचा प्रयत्न करत आहे. दि. 9 ऑगस्टला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत या अभियानाची सुरुवात करण्यात आली होती. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाशी 600 पेक्षा अधिक महाविद्यालये संलग्न आहेत. या महाविद्यालयातील सर्वांनाच या अभियानात सहभागी होण्याचे आवाहन विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. कारभारी काळे, प्र-कुलगुरू डॉ.संजीव सोनवणे, कुलसचिव डॉ.प्रफुल्ल पवार, अभियानाच्या आयोजन समितीचे अध्यक्ष व व्यवस्थापन परिषद सदस्य राजेश पांडे, राष्ट्रीय सेवा योजनेचे संचालक डॉ. प्रभाकर देसाई, विद्यार्थी विकास मंडळाचे संचालक डॉ. संतोष परचुरे यांनी केले आहे.
विद्यापीठाच्या कार्यकक्षेत येणाऱ्या पुणे, अहमदनगर आणि नाशिक येथून चांगला प्रतिसाद तर आहे, असे विद्यापीठाच्या विद्यार्थी विकास मंडळाचे संचालक डॉ. संतोष परचुरे यांनी स्पष्ट केले आहे.
विद्यापीठाकडून राबविल्या जाणाऱ्या या अभियानात केवळ जागतिक विश्वविक्रम म्हणून सहभागी न होता या निमित्ताने देशाच्या 75 वर्षाच्या राष्ट्राच्या स्वातंत्र्याच्या आठवणी जागविण्याचा दृष्टीने विद्यार्थ्यांनी यात सहभागी व्हावे.
– डॉ.संजीव सोनवणे, प्र- कुलगुरू, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ