पिंपरी, दि. 1 (प्रतिनिधी) – शासकीय दराप्रमाणे महापालिकेच्या रुग्णालयांमध्ये उपचाराकरिता दर आकारणी करण्यास सोमवारपासून (दि. 1) सुरुवात झाली. यापूर्वी केशरी रेशन कार्डधारकांना मोफत उपचार देण्यात येत होते. ते बंद केल्याने किरकोळ वादही झाले.
यापूर्वी महापालिकेच्या हद्दीत राहणाऱ्या आणि केशरी रेशन कार्ड असणाऱ्या रुग्णांवर मोफत उपचार केले जात होते. मात्र सोमवारपासून त्यांच्याकडूनही शुल्क आकारण्यास सुरुवात झाली आहे.
महापालिका वैद्यकिय विभागावर सुमारे 600 कोटी रुपये खर्च करते. मात्र त्या तुलनेत नागरिकांना दर्जेदार उपचार मिळत नाहीत. आधी रुग्णालयाचा कारभार सुधारा मगच दरआकारणी सुरू करा, अशी प्रतिक्रिया रुग्णांकडून येत होती. थेरगाव येथील रुग्णालयात यापूर्वी दर सोमवारी सुमारे 70 हजारांचा भरणा महापालिकेच्या तिजोरीत जमा होत असे.
या शुल्कवाढीमुळे रुग्णालयाच्या महसुलात सुमारे 35 टक्क्यांहून अधिक वाढ झाली. शुल्कवाढीनंतरच्या पहिल्याच सोमवारी एक लाख 10 हजार रुपयांचा भरणा महापालिकेच्या तिजोरी जमा झाल्याने थेरगाव रुग्णालयाचे प्रमुख डॉ. अभय दादेवार यांनी सांगितले.