मुंबई, चेन्नई, हैद्राबाद या शहरांनाही टाकले मागे
पुणे -विद्येचे माहेरघर, सांस्कृतिक राजधानी, पुणेरी खाद्यपदार्थ, बहुराष्ट्रीय कंपन्या आदींमुळे आंतरराष्ट्रीय स्तरावर नावाजलेल्या पुणे शहराला आता “मोस्ट क्राउडेड सिटी’ या सर्वेक्षणांत “टॉप टेन’मध्ये स्थान मिळाले आहे.
शहरांतील वाढती संख्या आणि वाहतूक कोंडी हे समीकरण होत असतानाच आशिया खंडातील सर्वाधिक गर्दीच्या रस्त्यांच्या यादीत पुणे शहर नवव्या क्रमांकावर स्थान पटकावले आहे. मुंबई, चेन्नई, हैद्राबाद या शहरांनाही पुण्याने याबाबत मागे टाकले आहे.
“आशियाई डेव्हलपमेंट बॅंके’ने चालू वर्षात जाहीर केलेल्या “एशियन डेव्हलपमेंट आउटलूक’मध्ये सर्वाधिक गर्दीच्या रस्त्यांची यादी प्रसिद्ध केली आहे. यासाठी 278 शहरांतील परिस्थितीचा आढावा घेण्यात आला होता. त्यानुसार ही यादी प्रसिद्ध केली गेली. या यादीत आशियाई देशांतील विविध 25 शहरांचा समावेश आहे. तर “टॉप टेन’मध्ये भारतातील 4 शहरांचा समावेश आहे.
नॅशनल ओशियन ऍन्ड ऍटमॉस्फेरिक ऍडमिनिस्ट्रेशन या संस्थेकडील एप्रिल 2017 ते ऑगस्ट 2018 या कालावधीतील सायंकाळनंतरचे रस्त्यावरील “इमेज’, ओक रिज राष्ट्रीय प्रयोगशाळेकडील माहिती आणि गुगल मॅप्सकडील माहितीचे विश्लेषण करून हे गर्दीचे रस्ते निश्चित करण्यात आले आहेत. यात प्रामुख्याने वाहनचालकांचा रस्त्यावरील कोंडीत वाया जाणाऱ्या वेळेचा विचार करण्यात आला आहे.
ही आहेत “टॉप टेन’ शहरे
मेट्रो मॅनिला (फिलिपिन्स)
क्वालालंपूर (मलेशिया)
यंगून सिटी (म्यानमार)
ढाका (बांगलादेश)
बंगळुरू (भारत)
हा नोई (व्हिएतनाम)
कोलकाता (भारत)
दिल्ली (भारत)
पुणे (भारत)
हो ची मिन्ह (व्हिएतनाम)