पुणे जगात 5 व्या क्रमांकावर : टॉप टेनमध्ये 4 शहरे भारतातील
वर्षभरात सरासरी 8 दिवस 1 तास जातो “फुकट’
पुणे – पुणेकर दिवसात कधी ना कधी, वाहतूक कोंडीचा अनुभव घेतात. हा पुणेकरांच्या दैनंदिन चर्चेचा विषय असतो. कोंडीवेळी नागरिक परस्परांना शेलक्या विशेषणांनी संबोधतात. या कोंडीचे मूल्यांकनही होत आहे. त्यानुसार जास्त वाहतूक कोंडी (वाहतूक कोंडीत अडकल्याचा अतिरिक्त वेळ) असणाऱ्या शहरात पुण्याचा जगात 5 वा क्रमांक आहे. पुणेकर साधारणपणे सर्वाधिक वर्दळीच्या काळात म्हणजे “पीक अवर्स’मध्ये प्रवासात 193 तास म्हणजे दरवर्षी 8 दिवस आणि 1 तास अधिकचा घालवतात.
या यादीत 4 थ्या क्रमांकावर मुंबई हे महाराष्ट्रातील आणखी एक शहर आहे. मुंबईतील वाहतूक कोंडी 65 टक्के आहे. सरासरी, मुंबईकर पीक अवर्समध्ये 209 तास म्हणजे वर्षाला 8 दिवस, 17 तास इतका अतिरिक्त वेळ वाहतूक कोंडीत घालवतात. मुंबईतील सर्वाधिक कोंडी (101 टक्के) 9 सप्टेंबर 2019, रोजी तर सर्वांत कमी वाहतूक कोंडी (19 टक्के) 21 मार्च 2019 रोजी होती.
टॉमटॉम या लोकेशन तंत्रज्ञान कंपनीने यावरील जाहीर केलेल्या अहवालात म्हटले आहे, की वाहतूक कोंडी असलेल्या जागतील 57 देशातील 416 शहरांत पुणे 5 व्या क्रमांकावर आहे. सर्वाधिक वाहतूक कोंडी असणाऱ्या जगातील पहिल्या 10 शहरांमध्ये भारतातील 4 शहरे आहेत.
अशावेळी कार शेअरिंगसारख्या सेवांमुळे वाहतूक कोंडी कमी होण्यास मदत होईल. मात्र, योजनाकर्त्यांनी वाहतूक कोंडीचे परिणाम अभ्यासण्यासाठी उपलब्ध सर्व साधनांचा वापर करायला हवा. त्यामुळे त्यांना पायाभूत सुविधांच्या संदर्भात महत्त्वाचे निर्णय घेता येतील. लोकेशन टेक्नॉलॉजी स्पेशालिस्ट वाहन चालवण्याच्या भविष्यकालीन पद्धतींवर काम करत आहेत. ऑटोनोमस गाड्यांसाठीचे हाय डेफिनेशन नकाशे ते इलक्ट्रिक वाहनांचे योग्यवेळी चार्जिंग इत्यादीमुळे वाहतूक कोंडी कमी करण्यास मदत मिळेल.
कोंडीने अब्जावधींचे नुकसान
मागील दशकात जगात 416 पैकी 239 शहरांमध्ये (57 टक्के) वाहतूक कोंडी वाढली आहे. फक्त 63 शहरांमध्ये वाहतूक कोंडी कमी झाली आहे. वाहतूक कोंडी ही आर्थिक बळकटीचे निदर्शक असली, तरी त्यामुळे अब्जावधींचे नुकसानही होत आहे.
बंगळुरू अव्वल
या यादीत 71 टक्के वाहतूक कोंडीसह बंगळुरू पहिल्या क्रमांकावर, तर नवी दिल्ली 56 टक्के वाहतूक कोंडीसह आठव्या क्रमांकावर आहे. सरासरी पातळीवर, बंगळुरुवासीय पीक अवर्समध्ये 243 तास म्हणजेच वर्षभरात 10 दिवस, 3 तास वाहतूक कोंडीत घालवतात. दिल्लीकर “पीक अवर्स’मध्ये 190 तास म्हणजेच वर्षभरात 7 दिवस, 22 तास वाहतूक कोंडीत घालवतात.