पुणे – अर्थमंत्री अजित पवार यांनी शुक्रवारी राज्याचा अर्थसंकल्प सादर केला. यात पुणे शहर आणि जिल्ह्यासाठी मोठ्या तरतुदी करण्यात आल्या आहेत. विशेषत: पुणे आणि पिंपरी चिंचवड शहरांतील दळणवळणासाठी 7 मेट्रो मार्गांचे सर्वेक्षण, एमएसआरडीसीच्या दोन्ही रिंगरोडच्या भूसंपादनासाठी निधी देण्यात आला आहे. तर, उत्तम आरोग्यासाठी “इंद्रायणी मेडिसिटी’ उभारली जाणार आहे. शिवाय, अन्य तरतुदींमुळे पुण्यातील पायाभूत प्रकल्पांना गती मिळणार असून, दळणवळण “सुपरफास्ट’ होण्याच्या आशा पल्लवित झाल्या आहेत. दरम्यान, शिक्षण क्षेत्रासाठी मात्र अपुरा निधी मंजूर झाल्याच्या प्रतिक्रिया उमटत आहेत.
पुण्याजवळ 300 एकर जागेत अत्याधुनिक स्वरुपाची “इंद्रायणी मेडीसिटी’ उभारण्यात येणार असून, त्यासाठी भरीव तरतूद अर्थमंत्री अजित पवार यांनी शुक्रवारी जाहीर केली. ही वैद्यकीय वसाहत सुरू करता असताना त्यामध्ये सर्व सुविधा एकाच ठिकाणी मिळण्याची सोय असणार आहे. याशिवाय सर्व उपचार पद्धती एकाच ठिकाणी उपलब्ध असलेली ही देशातील पहिली वैद्यकीय वसाहत ठरेल, असे पवार यांनी नमूद केले.
पवार यांनी सादर केलेल्या राज्याच्या 2022-23 चा अर्थसंकल्पात ही घोषणा केली. याशिवाय आरोग्यासाठी सुमारे 11 हजार कोटी रुपयांची एकूण तरतूद केली आहे. याशिवाय प्रत्येक जिल्ह्यात टेलिमेडिसिन रुग्णालय उभारण्यात येणार असून, त्यासाठी 3 हजार 183 कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून देण्यात येणार आहे.
11 मार्च 1886 रोजी पेनसिल्व्हेनिया वुमन मेडिकल कॉलेजमधून एम.डी. ही पदव्युत्तर पदवी प्राप्त करणाऱ्या डॉ. आनंदीबाई जोशी या पहिल्या भारतीय आणि मराठी डॉक्टर होत्या. आज या गोष्टीला 136 वर्षे पूर्ण झाली आहेत. त्यांचे स्मरण करून वैद्यकीय शिक्षण आणि औषधद्रव्य विभागासाठींच्या तरतुदीची माहिती दिली.
इंद्रायणी मेडिसिटीसाठी जागेची चाचपणी सुरू असून, ती लवकरच पूर्ण होईल. जिल्हा आरोग्य सोसायटीतर्फे याचा “डीपीआर’ तयार केला जाणार आहे. लवकरच तो राज्य सरकारला सादर केला जाईल. पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणामार्फत (पीएमआरडीए) ही मेडिसिटी उभारण्याचे काम केले जाण्याची शक्यता आहे.
काय असेल या वसाहतीत
या मेडिसिटीमध्ये ट्रॉमा क्रिटिकल, हृदयरोग, मूत्रपिंड, मेंदूरोग, दंतचिकित्सा, बालरोग, नेत्ररोग, एंडोक्रायनोलॉजी, गॅस्ट्रोएन्ट्रोलॉजी, मूत्ररोग, हिमॅटोलॉजी, अवयव प्रत्यारोपण, आयूष जनरल रुग्णालय, मानसिक पुनर्वसन केंद्र, स्त्रीरोग, रेडिओलॉजी, पुनर्वसन केंद्र, स्पोर्टस मेडिसीन, कॅन्सर आदी शाखांच्या 24 स्वतंत्र रुग्णालयांचा समावेश असेल. संशोधनाला चालना देण्यासाठी क्लिनिकल रिसर्च सेंटर, जेनेटिक मेडिसीन रिसर्च सेंटर, ओबेसिटी अँड डाएट मॅनेजमेंट, जीन्स बॅंक, रक्तपेढी, मेडिकल लायब्ररी डेटा सेंटर, स्टेम सेल अशा रुग्णालयांशी परस्परपूरक संस्थाही असतील.
“विकासाची पंचसूत्री’ सह मांडण्यात आलेला हा अर्थसंकल्प हा समाजाच्या विकासाच्या संधी वाढविणारा आहे. महिलांच्या विकासाच्या विशेष संधी आणि सामाजिक न्यायातून विकासाला चालना देणारा हा अर्थसंकल्प सर्वसमावेशक तरतुदी करणारा असल्याने आम्ही याचे स्वागत करतो.
– डॉ.नीलम गोऱ्हे, उपसभापती, विधान परिषद