पुणे – पुणे-सातारा महामार्गावरून प्रवास करणाऱ्या प्रवाशांना बनावट टोल पावती देऊन फसवणूक केल्याप्रकरणात एकाचा अटकपुर्व जामीन अर्ज न्यायालयाने फेटाळला. विकास दिनकर शिंदे (रा. सोनगीरवाडी, ता. वाई, जि. सातारा) असे त्याचे नाव आहे.
तो रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगार असून गुन्ह्याच्या अधिक तपासासाठी त्याचा जामीन फेटाळण्याची मागणी अतिरिक्त सरकारी वकील प्रेमकुमार अगरवाल यांनी केली. त्यानुसार जिल्हा व सत्र न्यायाधीश एम. आर. पुरवार यांनी याबाबत आदेश दिला.
बचाव पक्षाच्या वतीने अटकपुर्व जामीन मिळावा यासाठी न्यायालयात अर्ज करण्यात आला. त्यास सरकारी वकील अगरवाल यांनी विरोध केला. विकास याचे खेड शिवापुर टोल नाका येथील मॅनेजमेंट स्टाफ मध्ये नाव आहे. त्याने पीएसटीआरपीएल यांचा आनेवाडी येथील टोल नाक्यावर कब्जा करत राजकीय दबाव आणत तेथे टोल वसुली चालू ठेवली.
लेन नं. 1 व 16 वरील सॉफ्टवेअर ऍप्लीकेशन मध्ये बदल करून तेथील सिस्टीमला नवीन प्रिंटर जोडून त्याआधारे खोट्या पावत्या तयार करून प्रवाशांना दिल्या. 24 फेब्रुवारी आणि त्यापूर्वीच्या कालावधीत हा प्रकार घडला.
याद्वारे आरोपींनी 130 रुपयांची पावती देऊन 46 हजार वाहने सोडल्याचे ऑडीट रिपोर्टमध्ये स्पष्ट झाले आहे. याद्वारे त्यांनी कंपनीची 59 लाख 80 हजारांची फसवणूक केली असल्याने शिंदे याचा अटकपुर्व फेटाळावा अशी मागणी त्यांनी केली. न्यायालयाने ती मान्य केली.