विवेकानंद काटमोरे
हडपसर – राष्ट्रवादी कॉंग्रेस शरद पवार गटाच्या हडपसर विधानसभा अध्यक्षाचे नाव अखेर निश्चित झाल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांकडून मिळाली आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रवीण सादबा तुपे यांचे नाव अध्यक्षपदासाठी निश्चित झाले आहे. त्यामुळे कार्याध्यक्ष पदांवर आता कोणाची वर्णी लागणार, याकडे मतदार संघासह राज्यातील राजकीय मातब्बरांचे लक्ष लागले आहे.
राष्ट्रवादी कॉंग्रेस अजित पवार गटाच्या हडपसर विधानसभा अध्यक्ष व कार्याध्यक्षपदाच्या नियुक्तींच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी कॉंग्रेस शरद पवार गटाच्या गोटात हालचालींना प्रचंड वेग आला आहे. येत्या दोन दिवसांत विधानसभा अध्यक्षांच्या नावाची घोषणा करण्यात येणार आहे. यासाठी पक्षातील काही पदाधिकाऱ्यांनी चार नावे सुचवली आहेत. त्यात प्रवीण तुपे यांचे नाव आघाडीवर आहे. शहर अध्यक्ष प्रशांत जगताप आणि वरिष्ठांनी तुपे यांचे नाव निश्चित केले आहे. याची अधिकृत घोषणा लवकरच होऊ शकते. कोंढवा आणि हडपसर भागांतून तुपे यांच्या साथीला तीन कार्याध्यक्ष देऊन सामाजिक समतोल साधण्याचा पक्षाचा प्रयत्न असेल.
हडपसर विधानसभा मतदार संघ राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचा बालेकिल्ला मानला जातो. इतर काही पक्षांप्रमाणे काहीशी अंतर्गत गटबाजी व कुरघोडीचे राजकारण येथेही राहिले आहे. परंतु, ते कधी चव्हाट्यावर आले नाही. मात्र, सध्या राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे शरद पवार आणि अजित पवार असे दोन गट झाल्याने दोन्ही गटांकडून आपापल्या विधानसभा मतदार संघाच्या पदाधिकारी नियुक्त्या झाल्यानंतर पक्षाचे दोन्ही गटांना भविष्यात आमने-सामने आल्याशिवाय गत्यंतर नाही.
दरम्यान, राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्ष शरद पवार गटाचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी मतदार संघाच्या अध्यक्ष पदासाठी प्रवीण तुपे यांच्या नावाला दुजोरा दिला आहे. पुढील दोन दिवसांत हडपसर विधानसभा मतदार संघातील पदाधिकारी यांच्या अधिकृत नियुक्तया जाहीर केल्या जातील. ज्यामध्ये एक अध्यक्ष व तीन कार्याध्यक्ष नियुक्त केले जाणार आहेत. शरद पवार यांच्या गटाच्या नियुक्ती निर्णयातील ही एक महत्त्वाची बाब मानली जात आहे. दरम्यान, या नियुक्तीच्या चर्चेबाबत प्रवीण तुपे यांच्याशी संपर्क साधला असता तो होऊ शकला नाही.
पवार यांच्या जवळचे कार्यकर्ते…
राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या स्थापनेपासून प्रवीण तुपे हे पक्षाच्या विविध पदांवर सक्रिय आहेत. पूर्वीचा कॅन्टोन्मेट व सध्याच्या हडपसर विधानसभा मतदार संघाच्या अध्यक्ष पदाची धुराही त्यांनी सांभाळलेली आहे. याशिवाय गेल्या अनेक वर्षांपासून साधना बॅंक व हडपसर भाजीपाला सोसायटीचे संचालक व चेअरमन म्हणूनही ते कार्यरत आहेत. पक्षाकडून देण्यात आलेली जबाबदारी एकनिष्ठ म्हणून सांभाळणारा राष्ट्रवादीच्या पहिल्या फळीतील कार्यकर्ता म्हणून तुपे सुपरिचीत आहेत. शरद पवार यांच्या जवळचे कार्यकर्ते म्हणून त्यांना ओळखले जाते.