पुणे – “टपाल खात्यातर्फे आता रात्रीच्या वेळीही अत्यावश्यक वस्तूंची वाहतूक करणे शक्य होणार आहे. त्यासाठी टपाल खात्याने “मेल मोटर ट्रान्स्पोर्ट सर्व्हिस’चा पर्याय उपलब्ध करून देण्याचे निश्चित केले आहे.
याद्वारे आदल्या दिवशी बुकिंग केलेल्या वस्तूंचे पार्सल्स् त्वरीत दुसऱ्या दिवशी संबंधित शहरांत वितरीत करण्यात येतील. सरकारी आणि खासगी उद्योगांना देखील मेल मोटर ट्रानस्पोर्ट सर्व्हिसचा लाभ घेता येईल,’ अशी माहिती पुणे विभागाच्या पोस्ट मास्तर जनरल जी. मधुमिता दास यांनी दिली.
टपाल विभागातर्फे जनरल पोस्ट ऑफिस (जीपीओ) येथे पत्रकार परिषदेत त्या बोलत होत्या. दास यांनी टपाल खात्याच्या प्रगतीसंबंधीची आणि आगामी नियोजित योजनांबद्दलची माहिती दिली.
दास म्हणाल्या, “मेल मोटर ट्रान्स्पोर्ट या सेवेसाठी जीपीएस ट्रॅकिंगचा वापर करण्यात येईल. त्यामुळे पार्सल केंव्हा पोहोचले. त्यासंबंधीचीही माहिती मिळेल. सरकारी विभाग आणि खासगी उद्योजकांशीही त्यांच्याकडील अत्यावश्यक वस्तूंची वाहतूक, मेल मोटर ट्रान्स्पोर्टद्वारे करण्यासंबंधी आमची चर्चा सुरू आहे.’
टपाल खात्यातर्फे लवकरच रेल्वे तिकीट बुकिंगची व्यवस्था सुरू करणार आहोत. अनेक नागरिकांची पासपोर्टची मागणी आहे. सध्या टपाल विभागातर्फे आठ पोस्ट ऑफिस पासपोर्ट सेवा केंद्र सुरू आहे. लवकरच आणखी पोस्ट ऑफिस पासपोर्ट सेवा केंद्र (पीओपीएसके) वाढविण्यात येतील, असेही दास यांनी सांगितले.
ऑलिम्पिक पदक विजेत्यांसाठी शुभेच्छा…
टपाल विभागातर्फे 11 ते 17 ऑक्टोबर या कालावधीत राष्ट्रीय टपाल सप्ताह साजरा करण्यात आला. पुणे विभागात बचत बॅंक दिवस साजरा करून दिवसात 8799 खाती उघडली. तसेच 3267 पोस्ट लाइफ इन्श्युरन्सची खाती उघडली. ऑलिंम्पिक पदक विजेत्यांसाठी पुणे विभागातून नागरिकांनी 34 हजार ई-पोस्ट शुभेच्छा संदेश यंदा पाठविले, असे यावेळी अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले.