पुणे -गेल्या पाच ते सहा वर्षांपासून धोकादायक अवस्थेत असलेल्या महापालिकेच्या लोहियानगर येथील अग्निशामक दलाची मुख्य इमारत पाडून त्या ठिकाणी नवीन अद्ययावत इमारत बांधण्यात येणार आहे. या इमारतीसाठी तब्बल 22 कोटींचा खर्च केला जाणार असून हे काम मर्जीतील ठेकेदाराला मिळावे, यासाठी राज्यातील एक बडा मंत्री महापालिकेच्या मैदानात उतरला आहे. स्थानिक पदाधिकाऱ्यांच्या मदतीने या निविदेसाठी पालिका प्रशासनावर दबाव टाकला जात असून ज्या ठेकेदारासाठी हा खटाटोप केला जात आहे. त्याने या पूर्वी असे कोणतेही काम केलेले नाही. सध्या महापालिकेकडून सुरू असलेली अनेक कामे मंत्र्यांच्या मर्जीने देण्यात आली असून त्यात आणखी एका कामाची भर पडणार असून या प्रकरणाची महापालिकेच्या प्रशासकीय वर्तुळात चांगलीच चर्चा रंगली आहे.
काय आहे नेमके प्रकरण ?
लोहियानगर येथे महापालिकेच्या अग्निशामक दलाची मुख्य इमारत आहे. ही इमारत जूनी असून ती मोडकळीस आली आहे. या शिवाय, ठिकाणाची जागा मोठी असून या ठिकाणी अत्याधुनिक इमारत बांधण्याचे नियोजन आहे. गेल्या चार ते पाच वर्षांपासून अंदाजपत्रकात या कामासाठी निधी मिळत नव्हता. मात्र, या कामासाठी 22 कोटी रुपयांची निविदा काढली आहे. या निविदेत पात्र होण्यासाठी इमारत बांधल्याच्या दाखल्यांसह इतर अटी ठेकेदारांनी पूर्ण करणे आवश्यक आहे. 5 ठेकेदारांचे प्रस्ताव आले असून, कागदपत्रांची पूर्तता करण्यासाठी एक वेळा मुदतवाढ देण्यात आलेली आहे. त्यासंदर्भात ता. 24 रोजी कोणता ठेकेदार पात्र, अपात्र होणार यासाठी बैठक घेतली जाणार आहे.
राज्यातील मंत्र्याचा दबाव..
प्रशासनातील सुत्रांकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार, ज्या ठेकेदारासाठी हा खटाटोप चालला आहे. त्याच्याकडून रेल्वे विभागाकडे केलेल्या कामाचे दाखले जोडले आहेत, चॅनलिंग व पुलाच्या कामाचे दाखले जोडले आहेत, त्यामध्ये बांधकाम दिसून येत नाही. 2020-21 या वर्षीचे ताळेबंद जोडले नाही, त्यामुळे निविदा पात्र ठरत नाही यासह इतर आक्षेप इतर ठेकेदारांनी घेतले असून महापालिकेस काही तक्रारीही प्राप्त झालेल्या आहेत. तरीही याच ठेकेदाराला काम देण्यासाठी संबंधित विभागावर दबाव टाकला जात आहे.