नगर – नगर तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापतिपदी भाऊसाहेब बोठे तर उपसभापतिपदी रभाजी सूळ यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे. निवडणूक निर्णय अधिकारी तथा तालुका उपनिबंधक देवीदास घोडेचोर यांच्या अध्यक्षतेखाली सोमवारी (दि. 22) दुपारी ही निवड करण्यात आली आहे.
बाजार समितीच्या पदाधिकारी निवडीसाठी नवनिर्वाचीत संचालक मंडळाची विशेष सभा सोमवार (दि.22) दुपारी झाली. या सभेत सभापती पदासाठी भाऊसाहेब बोठे तर उपसभापतिपदासाठी रभाजी सूळ असे दोनच उमेदवारी अर्ज दाखल झाल्याने निवडणूक निर्णय अधिकारी घोडेचोर यांनी या निवडी बिनविरोध झाल्याचे घोषित केले. सभापतिपदासाठी बोठे यांना सूचक हरिभाऊ कर्डिले तर अनुमोदक संतोष म्हस्के असून उपसभापतिपदासाठी सूळ यांचा सूचक मधुकर मगर तर अनुमोदक भाऊसाहेब ठोंबे आहेत.
या विशेष सभेसाठी नवनिर्वाचित संचालक राजू आंबेकर, संजय गिरवले, सुधीर भापकर, भाऊ भोर, मधुकर मगर, रभाजी सुळ, सुभाष निमसे, मनिषा घोरपडे, आचल सोनवणे, संतोष म्हस्के, धर्मनाथ आव्हाड, हरिभाऊ कर्डिले, भाऊसाहेब बोठे, भाऊसाहेब ठोंबे, दत्तात्रय तापकीरे, सुप्रिया कोतकर, राजेंद्र बोथरा व निलेश सातपुते आदी उपस्थित होते. नगर बाजार समितीच्या 18 जागांसाठी निवडणूक झाली.
या निवडणुकीत गेल्या 15-16 वर्षांपासून सत्ता असलेल्या कर्डिले-कोतकर गटाने चौथ्यांदा बाजी मारत सर्व 18 जागा जिंकल्या. सत्ताधारी कर्डिले-कोतकर गटाच्या निवडून आलेल्या 18 संचालकांपैकी सभापती पदासाठी बोठे व उपसभापतिपदासाठी सुळ यांची नावे सुरुवातीपासूनच आघाडीवर होती.
शेतकरी हिताचे निर्णय घेणार : कर्डिले
गेल्या 15-16 वर्षात बाजार समिती चांगले काम करून समितीचा लौकिक राज्यात वाढविलेला आहे. यापुढील काळातही शेतकरीहिताचे निर्णय घेतले जातील. बाजार समिती तसेच नेप्ती उपबाजार आवारात रस्त्यांची कामे करून शेतकऱ्यांना व व्यापाऱ्यांना होणाऱ्या त्रासापासून सुटका केली जाईल. केंद्र व राज्य सरकारच्या विविध योजना बाजार समितीच्या माध्यमातून तळागाळातील शेतकऱ्यांपर्यंत पोहचविण्याचा प्रयत्न करू, असे माजी आमदार शिवाजी कर्डिले म्हणाले.