पुणे- राष्ट्रपती पदक मिळविण्यासाठी शहर पोलीस दलातील हवालदाराने उपायुक्त कार्यालयातील लिपिकांना हाताशी धरुन चक्क बनावट रेकॉर्ड तयार केल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी या हवालदारासह चौघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. राष्ट्रपती पदक मिळवण्यासाठी वैयक्तिक रेकॉर्ड निष्कलंक असणे महत्त्वाचे असते. त्यानुसार कागदपत्रे तयार करण्याचा उद्योग या हवालदाराच्या अंगलट आला आहे.
यासंदर्भात वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी केलेल्या तपासणीत सेवा पुस्तकातील शिक्षा लागलेले पान फाडून दुसरे पान चिटकविले असल्याचे निष्पन्न झाले आहे. हवालदार गणेश अशोक जगताप (नेमणूक विशेष शाखा), कनिष्ठ श्रेणी लिपिक नितेश अरविंद आयनूर (नेमणूक-पोलीस उपायुक्त कार्यालयातील गोपनीय शाखा), वरिष्ठ श्रेणी लिपिक रवींद्र धोंडिबा बांदल (नेमणूक पोलीस आयुक्त कार्यालय) तसेच वानवडी पोलीस ठाण्यात 2019 मध्ये नेमणुकीस असलेले डे बुक अंमलदार व गणेश जगताप यांचे अन्य साथीदार यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
हा प्रकार पोलीस उपायुक्त परिमंडळ 5 यांच्या कार्यालयात 26207 जुलै ते 29 जानेवारी 2020 दरम्यान घडला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हवालदार गणेश जगताप हे 2017 ते 2020 या कालावधीत वानवडी पोलीस ठाण्यात नेमणूकीस होते. कामात कसूर केल्याबद्दल 2 वर्षे वेतनवाढ रोखण्याची शिक्षा त्यांना झाली होती. ही शिक्षा 13 फेब्रुवारी 2018 रोजी देण्यात आली होती. राष्ट्रपती पदक मिळविण्यात ही शिक्षा आड येत होती. त्यामुळे त्याने कार्यालयातील गोपनीय शाखेतील कनिष्ठ श्रेणी लिपिक नितेश आयनूर तसेच वरिष्ठ श्रेणी लिपिक रवींद्र बांदल यांच्या मदतीने सेवा पुस्तकातील नोंदीचे बनावटीकरण करुन, खोटा दस्त तयार केला. त्यावर बनावट सह्या करुन, सरकारी शिक्यांचा गैरवापर करुन ही 2 वर्षे वेतनवाढ रोखण्याची शिक्षा झाली असताना त्याबाबतचे दस्तऐवज व रेकॉर्ड नष्ट करुन घेऊन जगताप याने स्वत:चा फायदा करुन घेतला. जगताप याला झालेल्या शिक्षेची अंमलबजावणी करण्याची जबाबदारी वानवडी पोलीस ठाण्यात नेमणुकीला असलेलया तत्कालीन डे बुक अंमलदारांची होती. त्यांनी या शिक्षेची अंमलबजावणी न करता जगताप याला मदत केली, म्हणून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
…असे फुटले बिंग
राष्ट्रपती पदकासाठी आपली कामगिरी योग्य आहे, असे वाटल्यास प्रत्येक पोलीस कर्मचारी आणि अधिकारी वरिष्ठांकडे अर्ज करू शकतो. त्यानुसार, जगताप गेले काही वर्षे अर्ज करत होता. त्यात आपल्याला कोणतीही शिक्षा झालेली नाही अथवा चौकशी प्रलंबित याचे प्रतिज्ञापत्र द्यावे लागते. जगताप याने केलेल्या अर्जाची पडताळणी करताना त्याच्या सेवा पुस्तकात दुसरे पान जोडलेले आढळून आले आणि त्यांचे बिंग फुटले.