पुणे – शहरातील वाढत्या लोकसंख्येचा ताण वाढतो आहे. त्यामुळे कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी पुणे ग्रामिण पोलीस दलातील काही भागाचा पुणे पोलीस आयुक्तालयात समावेश करण्यात येणार आहे.
तसेच लवकरच आयुक्तालयांतर्गत दोन नवीन पोलीस ठाणे निर्माण करण्यात येणार आहेत. ही पोलीस ठाणी चतुःशृंगी व हडपसर पोलीस ठाण्यांचे विभाजन करून नव्याने इतर भाग समाविष्ठ करून तयार होणार आहेत.
पुणे शहराचा विस्तार पाहता आणखी एक परिमंडळाची आवश्यकता असून शहर पोलीस दलातील विभागाची फेररचना करण्यात येणार असल्याचे पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी सांगितले. पुणे शहरात सध्या 5 परिमंडळांमध्ये 30 पोलीस ठाण्यांची विभागणी केली आहे. त्यामुळे लवकरच आणखी एका परिमंडळाची नव्याने निर्मिती होऊ शकते.
पुणे शहरातील अनेक प्रस्ताव गृह विभागाकडे प्रलंबित आहे. चतु:शृंगी, हडपसर या पोलीस ठाण्यांच्या हद्दीत आणखी एक नवीन पोलीस ठाणे तयार करण्याचा प्रस्ताव प्रलंबित आहे. तसेच हवेली, लोणी काळभोर पोलीस ठाणे शहर पोलीस दलात समावेश करण्याचा प्रस्तावाला मंजुरी मिळाली असली तरी त्याची अंमलबजावणी अद्याप झालेली नाही.