पुणे – करोना पार्श्वभूमीवर सार्वजनिक ठिकाणी थुंकणे धोकादायक आहे. त्यामुळे संसर्ग वाढण्याचा धोका आहे. तरीही काही थुंकीबहाद्दर रस्त्यात ठिकठिकाणी थुंकताना दिसतात.
त्यांना जाब विचारण्यास कुणी गेले तर अरेरावीची भाषा वापरण्यापर्यंत त्यांची मजल जाते. परंतु, अशा थुंकीबहाद्दरांवर महापालिकेच्या पथकाकडून कारवाई केली जात आहे.
काही बेशिस्तांकडून पान-मसाला, तंबाखू, गुटखा खाऊन रस्त्यांवरून चालताना अथवा वाहनातून जाताना पिचकाऱ्या मारल्या जात आहेत. करोना काळातही अशा उपद्रवी थुंकी बहाद्दरांना परिस्थितीची जराही जाणीव नसते.
अशा थुंकणाऱ्यांवरील कारवाईचा वेग आणखी वाढविण्यात येणार असून भविष्यातही तो सुरूच राहील, अशी माहिती प्रशासनाकडून देण्यात आली. दरम्यान, एप्रिल ते सप्टेंबर या सहा महिन्यांत महापालिकेकडून तब्बल 2 कोटींचा दंड वसूल केला.