पुणे- पीएमपीच्या बसेस संचालनात असताना थांब्याशिवाय दरवाजांची उघडझाप करण्याला मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्या कर्मचाऱ्यांवर कारवाइचे आदेश प्रशासनाने दिले होते. मात्र, संचलनात असणाऱ्या बसेसबाबत आदेशाची अंमलबजावणी आणि कारवाई होत नसल्याचे स्थिती आहे. रस्त्यावर धावणाऱ्या बसचे दोन्ही दरवाजे खुले असल्याचे चित्र आहे.
पुणे महानगर परिवहन महामंडळाच्या सीएनजी बसेसचे स्वयंचलित दरवाजे खुले असतात. परिणामी अपघाताची शक्यता असते. मात्र, याकडे कर्मचाऱ्यांकडून दुर्लक्ष होत होते. या पार्श्वभूमीवर चालक “एच कनेक्टर’ काढून स्वयंचलित दरवाज्याचे ऑपरेटींग करत नसल्यास, बसथांबा सोडून मार्गावर इतरत्र बसेसचे दरवाजे खुले असल्याचे आढळून आल्यास कर्मचाऱ्यांवर कारवाईचे आदेश प्रशासनाने दिले होते. याबाबत सूचनादेखील आगार व्यवस्थापक आणि खासगी बस ठेकेदारांना दिल्या होत्या.
मात्र, आदेशानंतर काही दिवसांत याचे उल्लंघन होत असल्याचे चित्र आहे. शहरातील मध्यवर्ती भागांत धावणाऱ्या बसेससह जिल्ह्यातील लांब पल्ल्याच्या बसेसचे दोन्ही दरवाजे खुले असतात. याशिवाय, अनेक बसची दारे दोऱ्यांनी बांधलेली असतात. त्यामुळे बसेसचे दरवाजे बंद करण्याकडे कर्मचारी दुर्लक्ष करतात.
दरवाजे बंद करण्याबाबत आगारांना सूचना दिल्या आहेत. यासह नादुरुस्त असणाऱ्या बसेसच्या दरवाजांची तांत्रिक कामे तातडीने करण्याचे देखील आगारांमध्ये आणि देखभाल दुरुस्तीच्या सूचना कर्मचाऱ्यांना दिल्या आहेत. यानंतर देखील नियमांचे उल्लंघन करणाऱ्या कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्यात येईल ,असे वाहतूक व्यवस्थापक दत्तात्रय झेंडे यांनी सांगितले.