महापालिकेचा महामेट्रोला इशारा
पुणे – शहरातील वाढते वायू प्रदूषण रोखण्यासाठी राज्य शासनाने नियमावली जाहीर केली आहे. त्यानुसार, बांधकामे तसेच मोठ्या प्रकल्पांच्या ठिकाणी धूळ रोखण्यासाठी पुरेशा उपाय योजना करण्याच्या नोटिसा महापालिकेने महामेट्रोसह शहरातील बांधकामांना बजाविल्या आहेत. मात्र, महापालिकेच्या नोटिशीला केराची टोपली दाखवित महामेट्रोकडून स्वारगेट येथे सुरू असलेल्या मेट्रो हबचे बांधकाम तसेच त्यासाठीच्या रेडीमिक्स कॉंक्रीट तयार करण्याच्या प्रकल्पाला सुरक्षा उपाय योजना अद्यापही करण्यात आलेल्या नाहीत. त्यामुळे, महामेट्रोने पुढील दोन दिवसात या दोन्ही ठिकाणी 25 फूट उंच पत्रे तसेच ओली ज्यूटची जाळी न बसविल्यास काम थांबविण्याचा इशारा थेट महापालिका आयुक्तांनीच शुक्रवारी महामेट्रोच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना दिला आहे.
हिवाळ्यात साधारणपणे वाहनांतील इंधनामुळे तसेच धुलीकणांमुळे प्रदूषणात भर पडून आरोग्याच्या समस्या निर्माण होत आहेत. ही परिस्थिती प्रामुख्याने देशातील सर्वच मोठ्या शहरांमध्येच पाहायला मिळत आहे. दिल्लीतील प्रदूषणाने धोक्याची पातळी गाठल्यानंतर केंद्र सरकारने सर्वच राज्य सरकारांना हवेचे प्रदूषण रोखण्यासाठी उपाययोजना करण्यासाठी काय उपाय योजना करण्यात आल्या आहेत.
याबाबत मुंबई उच्च न्यायालयाने सुमोटो याचिका दाखल केली आहे. त्यामुळे खडबडून जागे झालेल्या राज्य शासनासह, प्रदूषण नियंत्रण महामंडळाकडून महापालिकेस मार्गदर्शक सूचना पाठविण्यात आल्या असून त्याची अंमलबजावणी करण्याचे आदेश दिले आहेत. त्यानुसार, सर्वच बांधकाम व्यावसायिक, प्रकल्पांना नोटिसा पाठवून बांधकामांच्या ठिकाणी वरील निर्देशानुसार केलेल्या अंमलबजावणीबाबत माहिती मागविली आहे.
महामेट्रोकडून स्वारगेट येथे मेट्रो स्टेशनमध्ये मेट्रो हब उभारले जात आहे. याठिकाणी शहरातील सर्वात गर्दीचा जेधे चौक असून पीएमपी आणि एसटी स्थानकही येथेच असल्याने दररोज लाखांहून अधिक नागरिकांची ये-जा सुरू असते. बांधकामासाठीचा आरएमसी प्रकल्प असून त्याची धूळ उडत असल्याच्या तक्रारी थेट महापालिका आयुक्तांकडेच करण्यात आले आहे.