पुणे – उन्हाळी सुट्टी सुरू होताच पर्यटनासह बाहेरगावी जाण्याचे नियोजन ठरलेले असते. त्यामध्ये अनेक नागरिक प्रवासाचा वेळ वाचावा यासाठी विमानसेवेला प्राधान्य देतात. बाहेरदेशात पर्यटनासाठी जाणाऱ्यांची संख्याही अधिक असल्यामुळे दरवर्षी विमानतळावर समर सिझन सुरू होतो. त्यानुसार येत्या ३१ मार्चपासून पुणे विमानतळाचा समर सिझन (उन्हाळी हंगाम) सुरू होत आहे.
पुणे विमानतळावरून दिवसाला १९० ते १९५ विमानांची ये-जा सुरू आहे. यामध्ये दुबई व सिंगापूर या दोन आंतरराष्ट्रीय विमान सेवा सुरू आहेत. त्यामधून साधारण २६ ते ३० हजार प्रवासी प्रवास करतात. येत्या काही दिवसांमध्ये पुणे विमानतळाचे नवीन टर्मिनल सुरू होणार आहे.
त्यामुळे पुणे विमानतळावरून कोलकाता, जयपूर, बडोदा, सुरतबरोबरच दुबईसाठी आणखी एक विमान सेवा सुरू होण्याची शक्यता आहे. तसेच, इतर शहरांसाठी देखील काही विमाने सुरू करण्याचे विमान कंपन्या चाचपणी करत आहेत. त्यामुळे पुणे विमानतळावरून उन्हाळी हंगामात दिवसाला २०० पेक्षा जास्त विमाने उड्डाण करण्याची शक्यता आहे.
पुणे विमानतळ लष्काराचे विमानतळ असल्यामुळे सकाळी आठ ते ११ दरम्यान प्रवासी विमान सेवा बंद असते. त्यामुळे रात्रीच्यावेळी जास्तीत जास्त विमान उड्डाणे होतात. पुणे विमानतळासाठी सध्या येण्यासाठी १०९ आणि जाण्यासाठी १०९ असे २१८ स्लॉट देण्यात आलेले आहेत. त्यापैकी सध्या १८० पर्यंतच स्लॉट वापरले जात आहेत. पुणे विमानतळाचे साधारण ३६ ते ३७ स्लॉल रिकामे राहतात. हे रिकामे राहणारे स्लॉट हे रात्री साडेअकरा नंतरचे आहेत.
“पुणे विमानतळावरून सध्या वर्षभरात ९५ लाख प्रवासी प्रवास करतील. प्रवाशांचा हवाई वाहतुकीला वाढता प्रतिसाद पाहता पुढील आर्थिक वर्षात पुणे विमानतळावरून एक कोटींपेक्षा जास्त प्रवासी प्रवास करतील आणि हा उच्चांक असेल. त्यानुसार प्रशासनाने चांगल्या सोई-सुविधा पुरविणे आवश्यक आहे.” – धैर्यशील वंडेकर, हवाई वाहतूक तज्ज्ञ