पुणे – एकीकडे गृहकर्जाचे दर वाढले असून, जगात निर्माण झालेल्या मंदीसदृश स्थितीमुळे कर्मचारी कपात सुरू आहे. तथापि, अशी स्थिती असूनही घरांच्या विक्रीत देशभरात वाढ होत आहे. चालू वर्षातील दुसऱ्या तिमाहीत देशातील प्रमुख सात महानगरांमध्ये घरांच्या विक्रीत मागील वर्षीच्या तुलनेत 36 टक्के वाढ झाली आहे. ही वाढ देशात पुण्यात सर्वाधिक 65 टक्के झाली आहे.
“अनारॉक रिसर्च’ या संस्थेने एप्रिल ते जून या तिमाहीतील देशातील घरांच्या विक्रीचा अहवाल नुकताच जाहीर केला आहे. दिल्ली, मुंबई, पुणे, बंगळुरू, कोलकता, चेन्नई आणि हैदराबाद या महानगरांचा हा अहवाल आहे. रिझर्व्ह बॅंकेने व्याजदरात वाढ केल्याने गृहकर्जाचे व्याजदरही वाढले आहे. दरम्यान, जागतिक पातळीवर मंदीसदृश स्थिती असल्याने अनेक कंपन्यांनी कर्मचारी कपात केली आहे. असे असूनही दुसऱ्या तिमाहीत घरांच्या विक्रीत देशात मोठी वाढ नोंदवण्यात आली आहे.
देशातील सात महानगरांमध्ये दुसऱ्या तिमाहीत एक लाख 15 हजार 100 घरांची विक्री झाली. मागील वर्षी दुसऱ्या तिमाहीत 84 हजार 940 घरांची विक्री झाली होती. त्यात यंदा 36 टक्के वाढ झाली आहे. देशात दुसऱ्या तिमाहीत नवीन घरांची संख्या एक लाखावर पोहोचली आहे. मागील वर्षीच्या तुलनेत त्यात 25 टक्के वाढ झाली आहे. मागील वर्षी दुसऱ्या तिमाहीत ही संख्या 82 हजार 150 होती. मुंबई आणि पुण्याचा यात सर्वाधिक 63 टक्के वाटा आहे.
गृहकर्जाच्या वाढलेला दराचा परिणाम गृहनिर्माण क्षेत्रावर फारसा झालेला नाही. जागतिक पातळीवरील मंदीचे वारे असूनही घरांची विक्री वाढत आहे. प्रमुख सात महानगरांतील घरांची विक्री उच्चांकी पातळीवर पोहोचली आहे, असे अनारॉक रिसर्चचे अध्यक्ष अनुज पुरी यांनी सांगितले.
20 हजारांवर घरांची तीन महिन्यांत विक्री
देशात घरांच्या एकूण विक्रीत मुंबई आणि पुण्याचा वाटा 51 टक्के आहे. या दोन्ही शहरांत मिळून 58 हजार 770 घरांची विक्री झाली आहे. देशात पुण्यात घरांच्या विक्रीत सर्वाधिक 65 टक्के वाढ नोंदविण्यात आली आहे. मागील वर्षी दुसऱ्या तिमाहीत पुण्यात घरांची विक्री 12 हजार 500 होती. यंदा दुसऱ्या तिमाहीत ती 20 हजार 680 वर पोहोचली आहे.
एप्रिल ते जून घरांची विक्री
शहर घरांची विक्री वाढ (टक्के)
पुणे 20,680 65
मुंबई 38,090 48
चेन्नई 5,490 44
बंगळुरू 15,050 31
हैदराबाद 13,570 21
कोलकता 5,780 20
दिल्ली 16,450 7