पुणे – पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने ‘पवना नदी सुधार’ प्रकल्प हाती घेतला आहे. त्याअंतर्गत नदीचे पात्र स्वच्छ करणे, नदीमध्ये येणारे घरगुती आणि औद्योगिक सांडपाणी, मैला येत असल्यामुळे शुद्धीकरण करण्यासाठी उपाय योजना सुचविणे, नदी काठावरील मुख्य ठिकाणी नदी काठ विकसित करणे, आदी कामे करण्यात येणार आहे. त्यासाठी या प्रकल्पाचा ‘सर्वंकष आराखडा’ (डीपीआर) तयार करण्यासाठी सल्लागाराची नेमणूक प्राधिकरणाकडून करण्यात आली आहे.
केंद्र सरकारच्या “नमामी गंगे’ या कार्यक्रमांतर्गत इंद्रायणी नदी पुर्नजीवन करण्याचा निर्णय पीएमआरडीएने घेतला आहे. त्यानंतर आता पवना नदी सुधार प्र्कल्प प्राधिकरणाने हाती घेतला आहे. पवना नदीचा उगम हा मावळ तालुक्यातील कोळे चाफेसर या गावातून होतो. पुढे ही नदी येऊन सांगवी येऊन मुळा नदीला मिळते. सुमारे ५८ किलोमीटर लांबीची ही नदी आहे. ही नदीकाठी पिंपरी-चिंचवड शहर वसले आहे.
पिंपरी-चिंचवड शहरात मामुर्डी गावात प्रवेश करते, किवळे, रावेत, वाल्हेकर वाडी. चिंचवड, पिंपरी, कासारवाडी, फुगेवाडी आणि दापोडी, पुनावळे, ताथवडे, थेरगाव, काळेवाडी, रहाटणी, पिंपळे सौदागर, पिंपळे गुरव, नवी व जुनी सांगवी येथे येऊन ती मुळा नदीला मिळते. नदीच्या एकूण लांबीपैकी जवळपास पन्नास टक्के म्हणजे २४. ५ किलोमीटर नदी ही पिंपरी-चिंचवड शहरातून वाहते.
घरगुती आणि औद्योगिक सांडपाणी, मैला येत असल्यामुळे ही नदी प्रदूषित झाली आहे. नदी पात्रात कचऱ्याचे खच साचले आहेत, नदीचे पात्र स्वच्छ करणे व शुद्धीकरण करण्यासाठी उपाय योजना सुचविणे. नदी पात्रातून जलवाहतूक प्रणाली पुरविण्याच्या व्यवहार्यतेचे मूल्यांकन करणे, जलप्रदूषण होत असलेल्या ठिकाणे निश्चित करून त्यावर उपयोजना करणे, त्यासाठी प्रकल्पाचा ‘पूर्व सुसाध्यता अहवाल’ तयार करून सविस्तर प्रकल्प अहवाल (डीपीआर) तयार येणार आहे. त्यासाठी सीओईपी तंत्रज्ञान विद्यापीठाची मदत घेण्यात येणार आहे.