पिंपरी – दिल्लीमधून चोरीच्या चारचाकी गाड्यांची महाराष्ट्रात बनावट कागदपत्रांव्दारे विक्री करणाऱ्या आंतरराज्यीय टोळीला दरोडा विरोधी पथकाने अटक केली. त्यांच्याकडून एक कोटी ५७ लाख रुपये किंमतीच्या ११ चारचाकी गाड्या जप्त करण्यात आल्या आहेत.
अजीम सलीम पठाण (वय ३४ रा.रहीमतपूर, जि. सातारा), शशिकांत प्रताष काकडे (वय ३० रा. साखरवाडी, जि.सातारा), राजाराम उर्फ राजू तुकाराम खेडेकर (वय ३४, रा. पटवर्धन कुरोली, जि.सोलापूर), महेश भीमाशंकर सासवे (वय ३१, रा. राघवेद्रनगर, सोलापूर) अशी अटक आरोपींची नावे आहेत. तर साथीदार प्रशांत माने, विकास माने, भरत खोडकर, हाफिज, इलियास, रसूल शेख यांचा शोध सुरु आहे. विशेष म्हणजे यातील भरत खोडकर हा सांगली जिल्हा पोलीस दलात पोलीस शिपाई आहे.
दरोडा विरोधी पथकातील सहायक फौजदार महेश खांडे व पोलीस हवालदार नितीन लोखंडे यांना सराईत वाहन चोरट्यांबाबत माहिती मिळाली. त्यानुसार चोरीच्या गाड्यांसह अजीम पठाण व शशिकांत काकडे याला पथकाने ताब्यात घेतले. त्यांच्याकडून चोरीच्या १ कोटी ५७ लाख रुपये किमतीच्या ११ चार चाकी गाड्या जप्त करण्यात आल्या. अधिक तपासात त्यांच्या इतर साथीदारांची नावे निष्पन्न झाली. त्यातील राजाराम खेडेकर व महेश सासवे यांनाही अटक करण्यात आली. आरोपी महेश सासवे यांच्याकडे तपासात ५०० रुपये किमतीच्या दोन बनावट नोटा मिळाल्या असून याबाबत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
वरिष्ठ पोलीस निरीक्षक बाळकृष्ण सावंत, सहायक निरीक्षक अंबरीश देशमुख, उपनिरीक्षक भरत गोसावी, पोलीस अंमलदार महेश खांडे, औंदुबर रोंगे, उमेश पुलगम, विक्रांत गायकवाड, राहूल खारगे, नितीन लोखंडे, गणेश हिंगे, आशिष बनकर, प्रवीण माने, सागर शेडगे, प्रविण कांबळे, गणेश कोकणे, अमर कदम, गणेश सावंत, सुमित देवकर, विनोद वीर, समीर रासकर, चिंतामण सुपे यांच्या पथकाने ही कारवाई केली.