महापालिकेचा निर्णय ; वडगाव बुद्रुक येथे नवा प्रकल्प उभारणार
पुणे – जलशुद्धीकरण केंद्राचे वापर आयुर्मान हे ३० वर्षांचे असताना पर्वती येथील जलशुद्धीकरण केंद्र ५४ वर्षांपासून सुरू आहे. याच कारणातून हे केंद्र टप्प्याटप्प्याने बंद करण्याची प्रक्रिया महापालिकेने सुरू केली आहे. वडगाव बुद्रुक येथे १२५ एमएलडी क्षमतेचा नवीन जलशुद्धीकरण प्रकल्प उभारण्यात येणार आहे. यासाठी २१९ कोटी १३ लाख रुपयांच्या खर्चाच्या पूर्वगणनपत्रकास अंदाज समितीने मान्यता दिली असून ५० टक्के निधी हा केंद्र सरकारच्या अमृत-२ योजनेतून उपलब्ध होणार आहे.
पुणे शहराची वाढती लोकसंख्येनुसार २०३२ व २०४७ मधील पाण्याच्या मागणीचा अंदाज घेत जलशुद्धीकरण केंद्रांची क्षमता वाढविणे गरजेचे असल्याने नवा प्रकल्प उभारण्यात येणार आहे. सध्याच्या वडगाव जलशुद्धीकरण केंद्राची क्षमता २५० एमएलडी आहे, २०३२ मध्ये ही क्षमता २७७ एमएलडी प्रस्तावित आहे, तर समाविष्ट झालेल्या गावांमुळे १११.२१ एमएलडी पाण्याची मागणी वाढली आहे. त्यामुळे ३८८ एमएलडी पाण्याची मागणी आहे. यानुसार २०३२ पर्यंत विचार करता १२५ एमएलडी क्षमतेचा प्रकल्प वडगाव बुद्रुक येथे उभारण्याचा निर्णय पालिकेने घेतला आहे.
निविदा प्रक्रिया सुरू करणार…
वडगाव येथील जलशुद्धीकरण केंद्रासाठी महापालिकेची जागा उपलब्ध आहे. या कामासाठी एकूण खर्च २१९ कोटी १३ लाख रुपये अपेक्षित आहे. अमृत-२ योजनेअंतर्गत केंद्र शासन व राज्य शासनाकडून ५० टक्के निधी उपलब्ध होणार आहे. महापालिकेच्या अंदाजपत्रकात ५० कोटी रुपये तरतूद उपलब्ध आहे. आयुक्त विक्रम कुमार यांनी घेतलेल्या अंदाज समितीच्या बैठकीत यास मान्यता देण्यात आली आहे. त्यामुळे आता निविदा प्रक्रिया सुरू करता येणार आहे.