खडकवासला – सिंहगड-पानशेत परिसरांमध्ये हॉटेल, डाब्यामध्ये देशी, विदेशी दारू बेकायदा विक्री होत आहे. काल मर्यादेचे पालन न करता अगदी पहाटेपर्यंत सिंहगड परिसरात हॉटेल, ढाब्या फार्म हाऊस मध्ये धांगडधिंगा चालतो. या बिघडलेल्या परिस्थितीवर पोलिसांचे नियंत्रण नाही. स्थानिक नागरिकांनी वारंवार तक्रारी करून सुद्धा त्याकडे दुर्लक्ष होत आहे.
विविध महापुरुषांच्या जयंतीनिमित्त मंडळांनी सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन केले होते. आणि ते दिलेल्या वेळेत बंदही केले.नियम आहेत म्हणून पोलिसांनी कार्यक्रम, डीजे बंद करायला लावणाऱ्या पोलीस निरीक्षकांचे कौतुक केले. तर समाजमाध्यमातून टीकाही केल्या; मात्र एकीकडे हे चित्र असताना सिंहगड परिसरात अवैद्य मद्य विक्री आणि हॉटेल, फार्म हाऊस, ढाबे येथे रात्रभर चालणाऱ्या डीजे सिस्टीम व तरुण-तरुणींचा धांगडधिंगा सुरू असून याकडे पोलिसांचे लक्ष नाही.
पोलीस करतात काय?
शनिवार रविवार किंवा अन्य वारी नियोजन करून तरुण-तरुणी सिंहगड पानशेत परिसरात पार्टीसाठी येतात. पहाटेपर्यंत धांगडधिंगा सुरू असताना पोलिसांची रात्र गस्तीची गाडी येथे आणि निघून जाते; मात्र ही धागडधिंगा पार्टी सुरूच असते. असे स्थानिकांचे म्हणणे आहे.
मध्यरात्री नंतरही सिंहगड पानशेत परिसरात बेकायदा सुरू असणाऱ्या आणि नागरिकांना त्रासदायक ठरणाऱ्या हॉटेल फार्म हाऊस ढाबे रेस्टॉरंट बारवर निश्चितच कारवाई केली जाईल. या प्रकारची माहिती घेण्यात येईल
-अंकित गोयल,अधीक्षक पुणे ग्रामीण पोलीस
काय आहे स्थिती?
सिंहगड पानशेत रोडला हॉटेल फार्म हाऊस ढाबे आहेत. काही गावालगत असल्यामुळे नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. या हॉटेलमध्ये विना परवाना मद्य विक्री व मोठमोठ्या आवाजात डीजे सिस्टीम चालू असते. सिंहगड, खडकवासला, पानशेत या परिसरातील नागरिक दिवस संपताच रात्री झोपी जातात. त्यावेळेस काही हॉटेल्स, फार्म हाऊस या ठिकाणावरून वातावरणात रंग भरण्यास सुरुवात होते. येथील डीजेचा आवाज आसपास असणाऱ्या वाड्या, वस्त्यांमध्ये ही जातो; मात्र स्थानिक बड्या लोकांच्या जागा भाड्याने घेऊन हॉटेल आणि फार्म हाऊस उभे राहिल्याने सामान्य नागरिक भीतीने विरोधात बोलत नाहीत. डीजे व साऊंड सिस्टिम च्या तालावर झिंगाट होऊन मद्यधुंद झालेले तरुण-तरुणी रस्त्यावर येऊन धिंगाणा घालणे व नाचणे असे प्रकार अनेकदा दिसून येतात. रात्री अपरात्री रात्रपाळीवरून येणाऱ्या कामगार वर्गाला नाहक त्रास देण्याचे प्रकार या आधी घडले आहेत.