दर 38 वरून 34 रुपये लिटरवर
समीर भुजबळ
वाल्हे – मागील महिन्यांपासून दूध उत्पादक शेतकऱ्यांच्या दूध व्यवसायाला उतरी कळा लागली असून मागील महिन्यापासून दूध दरात तब्बल 4 रुपये कमी झाल्याने, दूध व्यवसायाला उतरली कळा लागली आहे. दुधाचे दर आता 38 रुपये लिटरहून थेट 34 रुपयांवर दुधाचा दर आला आहे.
मागील 15 ते 16 महिन्यांपासून गाय, म्हशीच्या दूध दरात वाढ झाली होती. प्रतिकूल परस्थितीमध्ये, शेतकऱ्यांसाठी हे ‘अच्छे दिन’ मानले जात होते. शिवाय स्थानिक पातळीवर वाढत्या दराची अंमलबजावणी झाल्याने शेतकऱ्यांना त्याचा फायदा झाला होता; मात्र, पुन्हा दुधाचे दर घसरण्यास सुरवात झाली आहे. ऐन उन्हाळ्यात दुधाच्या दरात तब्बल 4 रुपयांनी घसरण झाली असून, त्याचा परिणाम थेट शेतकऱ्यांच्या अर्थकारणावर होणार आहे. दुसरीकडे मात्र, पशूखाद्याचे दर दिवसेंदिवस वाढत असताना, दूधाचे वाढलेले दर दुधाला चांगली मागणी असतानाही कमी होत असल्याने, याचा फटका मात्र, शेतकऱ्यांना बसणार आहे.
मागील काही वर्षांपासून तरुण वर्ग दूध व्यवसायाकडे मोठ्याप्रमाणावर वळला असून बॅंकेचे, पतसंस्थेचे कर्ज घेऊन या व्यवसायात गुंतला आहे. या तरुण वर्गाला मोठा आर्थिक फटका या दूध दर कपातीमुळे होणार आहे. यामुळे दूध व्यवसायात नव्याने आलेल्या तरूण वर्ग कर्जाच्या विळख्यात अडकणार असल्याची भीती व्यक्त करीत आहेत. आगोदरच मागील काही महिन्यांपासून “लम्पी’ जनावरांना होणाऱ्या संसर्गजन्य आजारामुळे पशुपालक आधीच अडचणीत आहेत.
मागील वर्षांपासून दुधाच्या दरात वाढ झाल्याने शेतकरी हा जोड व्यवसाय वाढवण्याच्या तयारीत होता. मुख्य हंगामाला दूग्ध व्यवसयाची जोड दिल्यास उत्पादन वाढणार यामध्ये शंकाच नाही; मात्र दरात घट झाली असल्याने दुग्ध व्यवसायिक अडचणीत
आला आहे.
मागील महिन्यापासून आता चारा टंचाईचे नवे संकट निर्माण झाले आहे. मागील दोन-तीन वर्षांपासून पुरंदर तालुक्यात पावसाचे प्रमाण अधिक आहे. यामुळे जमिनीला वापसा लवकर न आल्याने ज्वारी पिकाची पेरणी कमी होत आहे. यावर्षी जास्त प्रमाणात उष्णता वाढत असल्याने तसेच उन्हाळ्यात कमी प्रमाणात ओला चारा उपलब्ध होत असून साखर कारखाने बंद झाल्याने, हिरवा चारा म्हणून मिळत असलेले वाढे बंद झाले. त्यामुळे गायी, म्हशीचे दूध घटत असून आगोदर अनेक समस्यांनी त्रस्त असलेला शेतकरी दूध दरातील कपातीमुळे आर्थिक संकटात सापडत आहे.
ओला-सुका चाऱ्याची कमी असताना, ऐन उन्हाळ्यात दुधाचे दर कमी केल्याने दूध उत्पादक शेतकऱ्यांवर आर्थिक संकट ओढावणार आहे. खासगी दूध संघ दुधाचे बाजारभाव कमी करत आहेत; तर दुसरीकडे मात्र पशुखाद्याचे दर दिवसेंदिवस वाढतच चालले आहेत. दुधाचे दर कमी करायचे असतील तर अगोदर पशुखाद्याचे दर कमी करावेत.
– नारायण पवार, दूध उत्पादक शेतकरी, वाल्हे
चुकीच्या धोरणात्मक निर्णयामुळे…
दरवर्षीच उन्हाळ्यात दुधाची मागणी जास्त वाढते. मात्र वाढत्या उष्णतेमुळे, तसेच मुबलक प्रमाणात उपलब्ध होत नसलेल्या हिरव्या चाऱ्याच्या टंचाईमुळे दुधाच्या उत्पादनात ऐन उन्हाळ्यात जास्त बाजारभाव मिळत असलेल्या वेळ दूध उत्पादान घट होते. यातच खासगी दूध संघ व शासनाच्या दूध उत्पादकांच्या चुकीच्या धोरणात्मक निर्णयामुळे ऐन कडाक्याच्या उन्हाळ्यात दुधाची मागणी जास्त वाढली असतानाही बाजारभाव कमी केल्याने दूध उत्पादक शेतकरीवर्ग आर्थिक संकटात सापडणार आहेत.