शहरातील खासगी रुग्णालयांना महापालिकेचे आदेश
पुणे – मान्य बेड संख्येच्या 50 टक्के बेड कोविड रुग्णांसाठी तातडीने उपलब्ध करून द्यावेत, असे आदेश खासगी रुग्णालयांना देण्यात आले आहेत. अन्यथा हे बेड ताब्यात घेण्यात येतील असा इशारा महापालिकेतर्फे देण्यात आला आहे.
करोना संसर्गात सर्व प्रकारच्या रुग्णांना उपचार मिळण्याचे धोरण लक्षात घेऊन खासगी रुग्णालयातील एकूण ऑपरेशनल बेड पैकी 80 टक्के बेड अधिग्रहित करण्याचे आदेश राज्य सरकारने जारी केले होते. त्यानुसार बहुतांश रुग्णालयांनी बेड उपलब्ध करून दिले आहेत. मात्र ज्यांनी अद्याप उपलब्ध करून दिले नाहीत, त्यांना हे आदेश देण्यात आले आहेत.
यामध्ये आयसोलेशन, ऑक्सिजनयुक्त, अतिदक्षता विभाग (विदाऊट व्हेंटिलेटर आणि विथ व्हेंटिलेटर) या सर्व प्रकारचे बेड असले पाहिजेत. त्यामध्ये जास्तीत जास्त बेड व्हेंटिलेटर, आयसीयू आणि ऑक्सिजन सुविधा असलेले असले पाहिजेत, अशी अट त्यांना ठेवण्यात आली आहे. आयसोलेशनची सुविधा महापालिकेने त्यांच्या स्वत:च्या सेंटर्समध्ये केली आहे.
करोना बाधितांवर उपचार होत आहेत, परंतु त्यांनी ऑपरेशनल बेडच्या 50 टक्क्यांपेक्षा बेड अजूनही उपचारासाठी राखीव ठेवले नाहीत अशी 38 रुग्णालये आहेत. त्यांच्याकडून 50 टक्के बेड ताब्यात घेतल्यास 1270 बेड वाढतील.
– डॉ. मनीषा नाईक, सहायक आरोग्य प्रमुख, मनपा