हर्षद कटारिया
मार्केट यार्ड – कृषी उत्पन्न बाजार समितीची शिवनेरी पथ येथे भाजी मार्केटसमोरील पार्किंगची जागा होलसेल फिश मार्केट व पोल्ट्री व्यवसायासाठी देण्यासाठी बाजार समिती संचालकांनी ठराव मंजूर केला. याबाबत दैनिक “प्रभात’मध्ये बातमी प्रसिद्ध झाल्यानंतर नागरिकांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. याबाबत सोमवारी (दि.11) उत्सव हॉटेल ते कृषी उत्पन्न बाजार समिती कार्यालय मार्गावर मोर्चा काढला जाणार आहे.
सकाळी 10 वाजता हा मोर्चा निघणार असून आमदार, माजी नगरसेवक, पदाधिकारी, कार्यकर्ते, नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित राहतील, अशी माहिती विजय नवलाखा यांनी दिली. दरम्यान, कोणत्याही परिस्थितीत येथे फिश मार्केट व पोल्ट्री व्यवसाय सुरू होऊ देणार नाही, असे यापूर्वीच आमदार माधुरी मिसाळ यांनी सांगितले आहे. आता वाढत्या विरोधामुळे कृषी उत्पन्न बाजार समिती निर्णय मागे घेणार, की ठाम राहणार? हे पाहावे लागेल.
दरम्यान, या प्रकरणात काही संचालकांनी मासळी विक्रेत्यांना हाताशी धरून अर्थपूर्ण चर्चा केल्याचे बोलले जात आहे. या निर्णयाला माजी नगरसेवक प्रवीण चोरबेले यांनीदेखील विरोध केला असून, त्यांनी या निर्णयाबाबत अधिकाऱ्यांची एका संचालकासमोर कानउघाडणी केल्याचे समजते. “मासळी बाजार होऊ देऊ नका,’ अशी तंबी त्यांनी या संचालकासदेखील दिली आहे. स्थानिक रहिवासी, नागरिक, आडते, व्यापारी यांचा मासळी बाजाराला विरोध असताना, संचालक मंडळ मासळी बाजार उभारण्यावर ठाम असल्याचे समोर येत आहे. तर, या निर्णयाविरोधात विविध संघटनांनी पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्याकडेही गाऱ्हाणे मांडले आहे.
बाजार समितीत भाजपचे बहुमत असून, फिश मार्केटचा ठराव त्यांनीच मंजूर केला आहे. तर, विरोध करणारे आमदार भाजपचेच आहेत. बाजार समिती पदाधिकाऱ्यांनी व्यापाऱ्यांना वेठीस धरून काय साध्य करू पाहत आहेत, हे जगजाहीर आहे. त्यामुळे असे ठराव करणारी कमिटी बरखास्त करावी, हीच आमची मागणी आहे. – अश्विनी कदम, राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्ष
बाजार समितीने फिश मार्केटचा मंजूर केलेला ठराव तातडीने रद्द करावा. स्थानिक पातळीवर या व्यवसायामुळे व्यापारी व नागरिकांना त्रास होणार असून अनेक सोसायट्यांचा विरोध आहे. बाजार समितीने तातडीने हा ठराव रद्द न केल्यास मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांच्याकडे तक्रार करू.- श्रीनाथ भिमाले, माजी सभागृह नेते, भाजप
फिश मार्केटचा ठराव येथील नागरिकांना त्रास देण्यासाठी आहे. परिसरात जैन समाज मोठ्या संख्येने राहत असून, असे व्यवसाय येथेच सुरू करण्यामागची भूमिका नक्की काय? हे व्यापारी वर्गाने समजून घ्यावे. या व्यवसायासाठी बाजार समितीने दुसरीकडे जागा शोधावी. अन्यथा आम्हाला तीव्र आंदोलन उभारावे लागेल. – बाळासाहेब ओसवाल, शिवसेना (ठाकरे गट)
पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीत भाजपचे बहुमत आहे. या संचालकांनी फिश मार्केट सुरू करण्याचा ठराव मंजूर केला आहे. भाजपचे आमदार विरोध करत करत आहेत. या परिसरात जैन बांधव राहतात. त्यांच्या श्रद्धा, भावनांशी खेळले जात असल्याची शंका येत आहे. मार्केट यार्ड भरभराटीस आणण्यात जैन व्यापारी बांधवांचे योगदान मोठे आहे. आज मासे, चिकन विक्रीला परवानगी देत आहेत. उद्या मद्यविक्रीला सुद्धा परवानगी मिळेल, अशी शंका निर्माण होते आहे. या निर्णयाविरोधात पुणे शहर कॉंग्रेस तीव्र आंदोलन करणार आहे. – अरविंद शिंदे, शहराध्यक्ष, कॉंग्रेस