उद्धव ठाकरे, पवारांसह मुंडेंच्याही लवकरच तोफा धडाडणार
सातारा – मतदानासाठी आता केवळ सहा दिवस बाकी राहिले असताना जिल्ह्यातील राजकीय वातावरण तापू लागले आहे. पार्श्वभूमीवर जिल्ह्यात ह्या आठवड्यात दिग्गजांच्या तोफा धडाडणार आहेत. बुधवार दि.17 रोजी कोरेगाव येथे दुपारी तीन वाजता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची तर सायंकाळी सात वाजता साताऱ्यातील गांधी मैदानावर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले आहे.
दरम्यान, राष्ट्रवादीचे अध्यक्ष खा.शरद पवार, शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे आणि विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांची देखील ह्या आठवड्यात जाहीर सभांचे आयोजन करण्यात आले आहे. खा.शरद पवार यांची शुक्रवार दि.19 रोजी दुपारी 3 वाजता दहिवडी ता.माण येथे तर शनिवार दि.20 रोजी साताऱ्यात प्रचार सांगता सभेसाठी उपस्थित राहणार आहेत. तसेच दोन्ही सभांसाठी धनंजय मुंडे हे देखील उपस्थित राहण्याची शक्यता आहे. शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे हे देखील कराड येथे महायुतीच्या उमेदवारांसाठी सभा घेणार आहेत. विशेष म्हणजे ठाकरे यांच्या प्रमुख उपस्थितीत कराड येथे प्रचाराची सांगता सभा होणार आहे. दरम्यान, राज ठाकरे यांची बुधवारी होणाऱ्या साताऱ्यात होणाऱ्या सभेकडे जिल्ह्याचे लक्ष लागून राहिले असून ते कशाप्रकारे टिका टिप्पणी करतात, हे पाहण्यासाठी निश्चितपणे मोठ्या प्रमाणात गर्दी होणार असल्याची चर्चा होताना दिसून येत आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदींची आज अकलूजमध्ये सभा
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची देखील आज अकलूज ता.माळशिरस येथे सभा होणार आहे. महायुतीचे उमेदवार रणजितसिंह ना.निंबाळकर यांच्या प्रचारार्थ सभेचे आयोजन करण्यात आले आहे. सकाळी 9 वाजता विजयसिंह मोहिते-पाटील क्रिडा संकुलासमोर सभा होणार असून त्यासाठी फलटण व माण-खटाव विधानसभा मतदारसंघातील बहुसंख्य कार्यकर्ते जाणार असल्याची माहिती सुत्रांनी दिली.